आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ विचारवंत, लेखक आणि दलित पँथर या सामाजिक संघटनेचे संस्थापक राजा ढाले यांचे निधन झाले आहे. मुंबईतील विक्रोळी येथील निवासस्थानी राजा ढाले यांनी वयाच्या 78 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. राजा ढाले यांच्या निधनामुळे आंबेडकरी जनता शोकाकूल झाली आहे. उद्या (बुधवार, 17 जुलै) रोजी दुपारी 12 वाजता विक्रोळी येथील त्यांच्या निवासस्थानाहून राजा ढाले यांची अंत्ययात्रा निघेल. दादर चैत्यभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
राजा ढाले यांनी अरुण कृष्णाजी कांबळे आणि नामदेव ढसाळ यांच्या मदतीने दलित पँथर या सामाजिक संघटनेची स्थापना केली. त्यापूर्वी ते भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या भारिप गटाचे प्रमुख होते.
तापसी, येरु, चक्रवर्ती. जातक, विद्रोह अशा नियतकालिकांतून त्यांनी लेखन केले. तसंच कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेक, संशोधनात्मक लेखन आणि संपादन असं त्यांचं अनेक प्रकारचं साहित्य आहे.
राजा ढाले यांनी भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर 1999 साली उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी 2004 साली देखील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता.
आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार, मार्गदर्शक आणि दलित पँथरचा महानायक हरपला, अशा शब्दांत रामदास आठवले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसंच ढाले यांनीच मला या चळवळीत आणले. त्यांचे निधन म्हणजे माझे वैयक्तिक नुकसान आहे, असेही आठवले म्हणाले. राजा ढाले यांच्या निधनानंतर सोशल मीडियावरुन त्यांना अनेकजण श्रद्धांजली वाहत आहे.