CM Devendra Fadnavis (फोटो सौजन्य - ANI)

अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. ज्या गेमचेंजर योजनेमुळे महायुतीला भरघोस मतं मिळाली असा दावा करण्यात आला होता त्याच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) कडून या बजेट मध्ये मोठी अपेक्षा होती. महायुतीच्या वचननाम्यामध्ये महिलांना 2100 रूपयांचे मानधन दरमहा मिळेल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात आज महायुतीच्या सरकारच्या पहिल्या बजेट मध्ये तशी घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला आहे. पण या योजनेसाठी यंदाच्या बजेट मध्ये निधी देखील कमी केल्याचं पहायाला मिळालं आहे.

लाडकी बहीण योजनेच्या निधीत घट ?

महाराष्ट्र सरकार ने मागील वर्षी 9 महिन्यांसाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती पण आज सादर झालेल्या पुढील वर्षभरासाठी लाडकी बहीण योजनेसाठी केवळ 36 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सध्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांची कडक अंमलबजावणी सुरू असल्याने लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे या योजनेसाठीही निधीत कपात झाली असू शकते असा अशी चर्चा सुरू झाली आहे.

लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची संख्या किती?

डिसेंबर 2024 मध्ये लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 46 लाख होती. आता यामध्ये 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे जानेवारी 2025 च्या शेवटापर्यंत लाभार्थ्यांची संख्या 2 कोटी 41 लाख झाली. आता मार्च अखेरीपर्यंत या लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये अजून घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नक्की वाचा:  Maharashtra Budget 2025: लाडक्या बहीणींना तूर्तास 2100 चा हफ्ता नाहीच; पहा अजित पवारांनी अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणा .

अजित पवारांची प्रतिक्रिया

अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेवर प्रश्न विचारताच 'मी शब्दाचा पक्का आहे. लाडक्या बहिणांना नाराज करणार नसल्याचं म्हटलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक शिस्त पाळून बजेट सादर केलं आहे. त्यामुळे भविष्यात त्यामध्ये वाढ करता येऊ शकते असं म्हटलं आहे. सध्या जितकी गरज आहे तितकी तरतूद केल्याचं म्हटलं आहे.