Ajit Pawar | X @Ajit Pawar

महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा 2025-26 वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. विधानसभा निवडणूकीमध्ये महायुतीला सरकारला एकतर्फी मोठं यश मिळाल्यानंतर आता या सरकारचं पहिलंच बजेट आज सादर करण्यात आले. त्यामुळे विधानसभेत गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana) चा जाहीरनाम्यामध्ये 2100 चा हफ्ता देऊ असं वचन देण्यात आलं होतं पण आजच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा झालेली नाही. म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना तूर्तास 1500 रूपयांच्या मानधनावरच समाधान मानावं लागणार आहे. आज अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)  पहा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या महत्त्वाच्या घोषणा कोणत्या?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मध्ये मानधन वाढणार का? याकडे राज्यातील बहीणींचं लक्ष लागलं होतं पण त्यामध्ये वाढ झालेली नाही. अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे याची माहिती देण्यात आली आहे त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये प्रस्तावित केल्याची माहिती दिली आहे. 24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट आगामी वर्षासाठी आहे असे अर्थमंत्री म्हणाले आहेत.

अर्थसंकल्पासाठी 7 लाख 20 कोटी रुपयांची तरतूद

2025-26 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 5 लाख 60 हजार 964 कोटी रुपये व महसुली खर्च 6 लाख 6 हजार 855 कोटी रुपये अंदाजित केला आहे. परिणामी 45 हजार 891 कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे.यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये खर्चासाठी 7 लाख 20 कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आली आहे.

राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण

'सर्वांसाठी घरे' या उद्दीष्टासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना - शहरी 2.0 अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी ग्रामीण घरकुलांसाठी 15 हजार कोटी तर शहरी आवास योजनांसाठी 8 हजार 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

वीज स्वस्त होणार

आगामी 5 वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होतील अशी घोषणा अजित पवार यांनी आज अर्थसंकल्पामध्ये केली आहे.महावितरण कंपनीने येत्या पाच वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज आग्रा इथे नजरकैदेत होते, तेथे आता भव्य स्मारक उभारण्याची राज्य शासनाने घोषणा केली आहे तर संगमेश्वर इथे स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीबाबत घोषणा करण्यात आली आहे.

अभिजात मराठी भाषा सन्मान दिनाची घोषणा

अभिजात मराठी भाषा सन्मान दिन हा आता 3 ऑक्टोबर दिवशी साजरा केला जाणार आहे. 3 ते 9 ऑक्टोबरदरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल.

प्रवास वेगवान होणार

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबईतील विमानतळाला जोडणारी मेट्रो सेवा सुरु​ केली जाणार अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. वर्सोवा ते भाईंदर, मुलूंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली, ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह याठिकाणी भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आलं आहे.त्यासाठी 64 हजार 783 कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प आहेत. मुंबई, नागपूर व पुणे या तीन शहरांमध्ये राज्य सरकाकडून अनेक मेट्रो मार्गिकांचं जाळं निर्माण करणार असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान आज अजित पवारांनी 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचं सरकारच उद्दिष्ट असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. आज अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी 11 व्यांदा बजेट सादर केले आहे.