महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा वाढता संसर्ग लक्षात संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत सरकार अंतिम निर्णयापर्यंत अजून पोहोचलेली नाही. मात्र हळूहळू जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नियम मात्र कडक करण्यात आले आहेत. तसेच ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्या जिल्ह्यात संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली आहे. त्यात आता हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातही उद्यापासून म्हणजेच 1 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही संचारबंदी काही विशिष्ट वेळापुरता नसून पूर्णवेळ असणार आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
हिंगोली जिल्ह्यात उद्यापासून सलग 7 दिवस ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदी दरम्यान 1 मार्च सकाळी 7 वाजल्यापासून 7 मार्च 2021 रात्री 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात दूध विक्री केंद्र, दूध विक्रेते यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुभा असणार आहे.हेदेखील वाचा- Lockdown In Maharashtra: राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
या कालावधीत जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका या कामकाजासाठी सुरू राहणार आहेत. बँका केवळ शासकीय कामकाजासाठी सुरू असतील. यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना येजा करण्यासाठी मुभा असेल, मात्र त्यांना ओळखपत्र बाळगणे बंधनकारक असेल. जिल्ह्यातील सर्व धार्मिक, प्रार्थना स्थळे, सर्व शाळा, महाविद्यालये, मंगलकार्यालये, लॉन्स बंद असणार आहेत. औषधी दुकाने चालू ठेवण्यासाठी मुभा राहणार आहे. त्याचबरोबर दुकाने, खानावळ, हॉटेल्स या काळात पूर्णवेळ बंद राहतील.
महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 8623 रुग्ण आढळले असून 51 जणांचा बळी गेला आहे.
यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 21 लाख 46 हजार 777 इतकी आहे. तर मृतांचा एकूण आकडा 52,092 वर पोहोचला आहे. सद्य घडीला राज्यात 20 लाख 20 हजार 951 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहे.