अनंत चतुर्दशीला भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, धावणार विशेष लोकल्स
मुंबई लोकल ( प्रातिनिधिक चित्र ) photo credits: PTI

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतील अनेक मंडळांमध्ये 24 तास दर्शन खुलं असतं. त्यामुळे भाविकांची होणारी गर्दी पाहाता रेल्वेने मुंबई लोकल्सच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. यंदा दहा दिवसाच्या गणपती विसर्जनाला म्हणजेच अनंत चतुर्दशीला रविवार आल्याने मोठ्या प्रमाणात भाविक बाहेर पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील 'या' लोकप्रिय गणपती मंडळांना नक्की भेट द्या !

23 सप्टेंबरचा मेगाब्लॉक

अनंत चतुर्दशीला दहा दिवसांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे. या दिवशी उसळणारी गर्दी लक्षात घेता रेल्वेने तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द केला आहे. त्यामुळे रविवारी गणेशभक्त मुंबईत रेल्वेने प्रवास करू शकतात.

मुंबई लोकल्सच्या फेर्‍या वाढवल्या

18 सप्टेंबरपासून पुढील पाच दिवस म्हणजे 22 सप्टेंबर 2018 पर्यंत भाविकांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कल्याण दरम्यान अधिक ट्रेन चालवल्या जाणार आहेत. रात्री सीएसएमटीवरून 1.30 वाजता सुटणारी ट्रेन 3 वाजता कल्याण स्ट्रेशनमध्ये पोहचणार आहे.

पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट ते विरार दरम्यान लोकल्सच्या फेर्‍या वाढवल्या आहेत. अनंत चतुर्दशीला होणारी गर्दी पाहता 23, आणि 24 सप्टेंबरच्या रात्री अधिक ट्रेन चालवल्या जाणार आहेत. रात्री 1.15 ला सुटणारी ट्रेन 2.50 ला विरार स्टेशनला पोहचेल. तर शेवटची ट्रेन पहाटे 3.20 ला सुटून 4.58 ला विरारला पोहचेल. रात्री 12 नंतरही पश्चिम रेल्वे मार्गावर खास रेल्वे व्यवस्था सुरू राहणार आहे. विरार ते चर्चगेटदरम्यान धावणारी पहिली विशेष ट्रेन रात्री 12.15ची असेल जी चर्चगेटला 1.52 ला पोहचेल. तर विरारहून सुटणारी शेवटची ट्रेन पहाते 3ची असेल जी चर्चगेटला 4.40ला पोहचेल.