 
                                                                 महाराष्ट्रात कोविड-19 (Covid-19) च्या नवीन रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, आज 711 प्रकरणे नोंदली गेली आहेत. हा आकडा मागील दिवसाच्या तुलनेत जवळजवळ 186% ची वाढ दर्शवतो. याआधी 248 प्रकरणे नोंदवली गेली होती. सोबतच या संसर्गजन्य संसर्गामुळे राज्यात गेल्या 24 तासांत चार मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये साताऱ्यात दोन, पुण्यात एक आणि रत्नागिरीत एक मृत्यू झाला आहे. गेल्या सात दिवसांत राज्यात एकूण 11 मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या, राज्याचा मृत्यू दर 1.82% आहे.
नुकतेच महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी घोषणा केली की, कोविड-19 प्रकरणांच्या वाढीला प्रतिसाद म्हणून, राज्यात 13 आणि 14 एप्रिल रोजी मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने कोविड सज्जतेसाठी मॉक ड्रिल घेण्याबद्दल सूचित केले होते. नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.
सावंत म्हणाले की, ‘राज्यात कोविडचा आकडा वाढत आहे पण त्याचा फारसा परिणाम होत नाही कारण हा सौम्य प्रकार आहे. घाबरण्याची गरज नाही पण गर्दीच्या ठिकाणी जाताना प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे.’ महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या भागात कोविडमध्ये लक्षणीय वाढ होऊन, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. (हेही वाचा: राज्यात Covid-19 आणि Seasonal Influenza रुग्णांमध्ये वाढ; जाणून घ्या लक्षणे, उपाययोजना व घ्यावयाच्या काळजी)
दरम्यान, वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये यामधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच गर्दीच्या व सार्वजनिक ठिकाणी जसे आठवडी बाजार, एसटी स्टॅंड परिसर, यात्रा, मेळावे, लग्नसमारंभ, मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येण्याची ठिकाणे या सर्व ठिकाणी सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मास्कचा वापर करावा. सामाजिक अंतर राखून वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही केले आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
