कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ऑनलाईन अभिवादन करण्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांचे आवाहन; येथे पहा चैत्यभूमीवरील Live प्रक्षेपण
Kishori Pednekar (Photo Credit: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायांनी दादर (Dadar) येथील चैत्यभूमी स्मारकावर येवू नये. आंबेडकरांना ऑनलाइन अभिवादन करावे, असे आवाहन मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar)  यांनी केले आहे. तसंच ऑनलाईन अभिवादन करण्यासाठी आणि चैत्यभूमीवर थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी काही लिंक्सही उपलब्ध करुन दिल्या आहेत. (Mumbai: कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन)

कोविड-19 चे संकट अद्याप संपलेले नाही. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे महापरिनिर्वाण दिन साजरा करता येणार नाही. भीम सैनिकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणूनच चैत्यभूमीवर गर्दी करु नका असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर बाबासाहेबांचे आचार आणि विचार अंगी भिनवून आहे तिथूनच ऑनलाईन अभिवादन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी अनेक भीन नेत्यांनी देखील पाठिंबा दर्शवल्याचे त्यांनी सांगितले. यंदा बाबासाहेबांना केवळ शासकीय अभिवादन करण्यात येईल. त्यामुळे त्याच लोकांना आत प्रवेश मिळेल, हे ही त्यांनी स्पष्ट केले. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाचीही त्यांनी आठवण करुन दिली.

पहा व्हिडिओ:

bit.ly/abhivadan2020yt, http://bit.ly/abhivadan2020fb, http://bit.ly/abhivadan2020tt यावर तुम्ही दादर चैत्यभूमीवरील लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी करु नये, असे आवाहन केले होते. यंदा अनेक सण-समारंभावर कोविड-19 चे सावट आहे. यामुळे सर्वच सण साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. तर अनेक समारंभ, उत्सव रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, कोविड-19 चा संसर्ग टाळण्यासाठी हे विशेष आवाहन आंबेडकरी अनुयायांना करण्यात आले आहे.