
राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन ( Maharashtra Legislative Assembly Monsoon Session) यंदा पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनावर कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाची छाया आहे. त्यामुळे यंदा राज्याचे अधिवेशन होणार की पुढे ढकलले जाणार याबाबत उत्सुकता आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक येत्या सोमवारी (18 मे) पार पडत असल्याचे समजते. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. नियमानुसार येत्या 22 जूनपासून राज्या विधिमंडळ अधिवेशन सुरु होणे अपेक्षीत आहे. परंतू, राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या हळूहळू वाढत आहे. कोरोना व्हायरस संकटाचा सामना करण्यासाठी देशात आणि राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. संपू्र्ण जगभरात अशीच स्थिती आहे. ही पार्श्वभूमी विचारात घेता विधिमंडळ अधिवेशनाबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 20 मार्च पर्यंत चालणार होते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तशी भावनाही बोलून दाखवली होती. मात्र, कोरोना व्हायरस संकटामुळे लॉकडाऊन घेण्यात आला आणि अर्थसंकल्पीय अधिवेश आवरते घेण्यात आले. या अधिवेशनादरम्यानच पावसाळी अधिवेशन 22 जून पासून सुरु होईल असे जाहीर करण्यात आले होते. (महाराष्ट्रासह भारतातील कोरोना व्हायरस संदर्भातील आकडेवारीसाठी इथे क्लिक करा. )
पावसाळी अधिवेशनासमोर संभाव्य अडचणी
- पावसाळी अधिवेशन ठरल्या तारखेला (22 जून) घ्यायचे तर त्यासाठी जिल्हा प्रशासनाला काम करावे लागेल.
- विधिमंडळात उपस्थित होणारे तारांकित प्रश्न, प्रश्नोत्तराचे तास आदी गोष्टींसाठी जिल्हा प्रशासनाला काम करावे लागते.
- दरम्यान, कोरोना व्हायरस संकट विचारात घेता सरकारी कार्यालयं ठप्प आहेत. जी सुरु आहे त्यात अल्प कर्मचाऱ्यांमध्ये काम केले जात आहे.
- अधिवेशन घ्यायचे तर जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर कार्यरत व्हावे लागेल. त्यासाठी कोरोना आणि लॉकडाऊन संदर्भात लागू असलेल्या नियमांना काहीशी शिथीलता द्यावी लागेल.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दोन्ही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तसंच सर्व पक्षाचे गटनेते उपस्थित राहतील.
दरम्यान, महाराष्ट्रात आजघडीला कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 27524 इतकी आहे. त्यातील रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या 20446 आहे. उपचार घेऊन प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने 6059 जणांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आला आहे. तर, आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित 1019 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.