Coronavirus Outbreak In Maharashtra: पुणे शहरात खाजगी रूग्णालयामध्ये 52 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू; राज्यातील मृतांचा आकडा 9
Coronavirus Death | Photo Credits: Pixabay.com

पुणे शहरामध्ये आज (30 मार्च) कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पुण्यातील खाजगी रूग्णालयामध्ये दाखल असलेल्या 52 वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तीला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. दरम्यान 22 मार्च दिवशी त्याला कोरोना असल्याचं निदान झालं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड होत गेल्याने अखेत त्यांची कोरोना सोबतची झुंज अयशस्वी ठरली आहे. पुण्यातील या मृत्यूमुळे आता राज्यातील कोरोनामुळे बळी गेलेल्यांचा आकडा 9 वर पोहचला आहे. पुणे शहरात आज आणखी 3 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यकृताच्या उपचारासाठी दाखल झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे भाऊ आणि वहिनी यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सोबतच बर्म्युडा येथून परतलेल्या एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे शहर 26 आणि ग्रामीण भागात 5 असे एकूण 31 जण विविध भागात उपचार घेत आहेत.

दरम्यान राज्यातील कोरोनाग्रस्तांवर उपचार करणार्‍या नायडू हॉस्पिटलमधील नर्स आणि डॉक्टरांसोबत काल (29 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खास व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारा चर्चा करून उपस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळेस लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं पुन्हा त्यांनी आवाहन केलं आहे. Coronavirus: महाराष्ट्रात आढळले आणखी 12 नवे रुग्ण ; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 215 वर.  

दरम्यान आज सकाळपर्यंत राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 215 वर पोहचली असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळेस दरम्यान, पुणे- 5 , मुंबई- 3, नागपूर- 2 , कोल्हापूर आणि नाशिकमध्ये प्रत्येकी एक रुग्ण असे एकूण 12 नवीन रूग्ण असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सध्या देशातही कोरोनाबाधितांचा आकाडा 1000 च्या पार गेला आहे. यापैकी 99 जण कोरोनामुक्त झाल्याने घरी परतले आहे. दरम्यान कोरोनाला रोखण्यासाठी सध्या भारत देश 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन असेल असं सांगण्यात आले आहे.