Coronavirus विरुद्धच्या लढ्यासाठी एकत्रित येऊन 5 एप्रिल रोजी दिवे लावण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे आमदार रोहित पवार यांच्याकडून स्वागत
PM Narendra Modi & Rohit Pawar (Photo Credits: PTI)

भारत देशातील कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धचा लढा अधिक तीव्र झाला आहे. हा लढा एकत्रित लढायचा असून यासाठी एकजूट महत्त्वाची आहे असा संदेश मोदींनी आज देशवासियांना दिला. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी दिवे प्रज्ज्वलित करण्याचे करण्याचे आवाहन केले आहे. मोदींच्या या आवाहनाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्वागत केले आहे. ट्विटच्या माध्यमातून रोहित पवार यांनी मोदींना आपला पाठिंबा दर्शवला आहे. आपल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी लिहिले की, "दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं." तसंच सोशल मिडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेऊन एकतेचा हाच संदेश अधिक घट्ट करुया असं आवाहनही रोहित  पवार यांनी यावेळी केलं.

दिवे लावण्याच्या मोदींच्या या आवाहनावर संमिश्र प्रतिक्रीया उमटत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जितेंद्र आव्हाड, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी यावर टीका केली आहे. यापूर्वीही नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर त्यावरही अनेक प्रकारे टीका करण्यात आली होती. (जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात यांच्याकडून नरेंद्र मोदींच्या 5 एप्रिलला 9 मिनिटांसाठी दिवे लावा एकजूट दाखवा उपक्रमावर टीका)

रोहित पवार ट्विट:

लॉकडाऊन मुळे आपण एकटे आहात असे समजू नका तर संपूर्ण देश आपल्यासोबत आहे. ही भावना अधिक बळकट करण्यासाठी एकजूटीने दीप प्रज्ज्वलित करण्याचे आवाहन मोदींनी केले आहे.  कोरोनामुळे पसरलेला निराशमय अंधःकार दिवा, मेणबत्त्या, टॉर्च च्या माध्यमातून दूर करुन धैर्यमय प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे प्रयोजन यामागे असल्याचे मोदींनी सांगितले.

जनता कर्फ्यू दिवशी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याच्या उपक्रमाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता दिवे लावण्याच्या या उपक्रमाला लोक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.