बेपत्ता असलेल्या एका कोरोना व्हायरस (Coronavirus ) संक्रमित रुग्णांचा मृतदेह चक्क रुग्णालयाच्याच शौचालतात आढळून आला आहे. हा रुग्ण तब्बल 14 दिवस बेपत्ता होता. मुंबई (Mumbai) येथे असलेल्या शिवडी येथील टीबी रुग्णालयात (TB Hospital Sewri ) हा प्रकार घडला आहे. हे रुग्णालय कोविड सेंटर म्हणून सेवेत आहे. रुग्णालयातील शौचालयाचा वापर इतर रुग्णही करत असतात. त्यामुळे हे शौचालय बंद होते की गेले 14 दिवस शौचालयांची स्वच्छताच करण्यात आली नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. महापालिकेने (BMC) या घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेशही दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मृतदेहाची दुर्गंधी येत असून, हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाला आहे. मृतदेह इतका वाईट स्थितीत आहे की, हे प्रेत स्त्रीचे आहे की पुरुषाचे हे ओळखणेही कठीण झाले आहे. त्यामुले मृतदेहाची ओळख तपासण्यासाठी रुग्णालयातील कागदपत्रे (रेकॉर्ड) तपासण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, वॉर्डमध्ये काम करणाऱ्या जवळपास 40 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
दरम्यान, सूर्यभान यादव नावाचा एक 27 वर्षीय रुग्ण 4 ऑक्टोबरपासून वॉर्डातून बेपत्ता होता. हा रुग्ण बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. मात्र, अनेकदा टीबीचे रुग्ण रुग्णालयातून पळून जातात. या आधीही अशा घटना घडल्या आहेत, असे प्रसारमाध्यमांनी प्रशासनाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (हेही वाचा, COVID-19 Vaccine Update: भारतामध्ये Bharat Biotech च्या Covaxin ला Phase 3 मानवी चाचण्यांसाठी परवानगी; देशात 10 राज्यांत होणार ट्रायल्स)
सूर्यभान यादव यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोरेगाव येथील एका डॉक्टरांच्या संदर्भावरुन त्यांना इथे पाठविण्यात आले होते. जाधव यांनी रुग्णालयात दाखल होताना आपल्या निवासाचा पत्ता पुरेसा दिला नव्हता. यादव हे ज्या वॉर्डामध्ये त्या वॉर्डात एकूण 11 रुग्ण होते. सूर्यभान जाधव हे शौचालयात गेल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांचा तेथेच मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते 4 ऑक्टोबरपासून बेपत्ता होते.