देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थिती काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत घरात थांबून कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन सरकारने केले आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तर दिवसागणिक नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने त्यांची चाचणी करण्यापासून ते उपचारापर्यंत सर्व गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. याच पार्श्वभुमीवर आता राज्य सरकारने सरकारी, महापालिकांच्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्या, उपचार आणि जेवणाची सोय मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्यांसाठी आता टेस्ट लॅबची संख्या वाढवण्यात आली आहे. तर आता वैद्यकिय महाविद्यालयांत सुद्धा कोरोनाची चाचणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.सध्या 40 खासगी लॅब असून त्यांची संख्या वाढवून 60 ऐवढी केली जाणारर आहे. या लॅबमधून दिवसाला 7 हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. त्याचसोबत केंद्र सरकारने अधिक प्रमाणात टेस्ट किट राज्याला पुरवल्या पाहिजेत असे ही अमित देशमुख यांनी म्हटले आहे. त्याचसोबत नागरिकांनी त्यांच्या मध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तातडीने त्यासंबंधित चाचणी करुन घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.(कोरोना विषाणूबद्दल माहिती: पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 4 जणांना Coronavirus ची लागण; शहरातील बाधितांच्या संख्या 89 वर पोहचली)