Coronavirus: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कुर्ला, चेंबुर आणि चुनाभट्टी येत्या 11-12 एप्रिल रोजी पूर्णपणे बंद राहणार
| (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच लॉकडाउनच्या काळात नागरिकांना वारंवार घरी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तरीही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येत असल्याने पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. तसेच मुंबईतील दाट लोकवस्तीच्या येथे आता लॉकडाउनच्या आदेशाचे कठोर पालन करण्यासाठी ड्रोनची नागरिकांवर नजर राहणार आहे. त्याचसोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही लॉकडाउन वाढवायचा की नाही ते नागरिकांच्या हातात असल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभुमीवर कोरोनाबाधितांचा आकडा आणि त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे येत्या 11-12 एप्रिल रोजी कुर्ला, चेंबूर आणि चुनाभट्टी पूर्णपणे बंद राहणार असल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी म्हटले आहे.

कोविड-19 संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कुर्ला परिसरातील पूर्वेकडील कुरेशी नगर, टिळक नगर येथे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी मध्ये येत्या 11 एप्रिल (शनिवारी) आणि 12 एप्रिल (रविवारी) पूर्णपणे बंद पाळण्यात येणार आहे. मात्र बंदच्या या दोन दिवसात वैद्यकिय सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.(Coronavirus: महाराष्ट्रात आज कोरोना विषाणू च्या 229 नवीन रुग्णांची नोंद; राज्यातील संक्रमितांची एकूण संख्या 1364 वर)

दरम्यान, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आहे. त्यानुसार कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 1364 वर पोहचला आहे. तसेच 1142 जणांवर कोरोनासंबंधित उपाचार सुरु असून गुरुवारी एकाच दिवशी 25 जणांनी आपला जीव गमावला आहे. मुंबईत वाढता कोरोनाचे संक्रमण पाहता नागरिकांनी अधिक जागरुक राहणे सध्याच्या स्थितीत महत्वाचे आहे.