Nashik Farmar distributing wheat to needy (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाची गंभीरता नागरिकांनाही उमगू लागली आहे. लॉकडाऊनमुळे (Lockdown) बेरोजगार झालेले मजूर, कामगार यांच्या सह गरजवंताना मदत करण्यासाठी समाजातून अनेक हात पुढे येत आहेत. नाशिक (Nashik) येथील एका शेतकऱ्याचा एक निर्णय अगदी सुखावून टाकणारा आहे. आपल्या एक एकर जमिनीत पिकणारा गहू गरजूंना देण्याचा निर्णय नाशिक मधील एका शेतकऱ्याने घेतला आहे. त्याची 3 एकर जमिन असून त्यातील एक एकर जमीनीत पिकणाऱ्या गव्हाचे गरजूंमध्ये वाटप करण्याचा निर्णय या शेतकऱ्याने घेतला आहे. दत्ताराम पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून ते म्हणाले की, "मी एक सामान्य शेतकरी आहे. माझी आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नाही. पण माझ्याकडे एक चपाती असेल तर त्यातील अर्धी चपाती मी नक्कीच गरजवंतांना देईन."

कोरोना व्हायरसच्या गंभीर संकटात सामाजिक भान राखत या शेतकऱ्याने घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे. आर्थिक परिस्थिती फारशी ठीक नसतानाही आपल्याकडे जे आहे त्यातील थोडे इतरांना देण्याची वृत्ती मनाचा मोठेपणा दाखवते.

ANI Tweet:

कोरोनाच्या संकट काळात समाजातील विविध स्तरातून मदतीचे हात पुढे येत आहेत. सेलिब्रेटी, धार्मिक संस्थांनी मोठी मदत केली असून सामान्य नागरिक आपल्या परिने शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोरोना व्हायरसच्या संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोरोना व्हायरसच्या नावाने स्वतंत्र बँक खात्याची निर्मिती करण्यात आली आहे. यात मदत जमा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात मदत म्हणून शिवसेना, राष्ट्रवादीच्या आमदार-खासदारांनी आपला महिन्याभराचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे.