Coronavirus in Maharashtra: डोंबिवली येथील 25 वर्षीय तरुण COVID-19 पॉझिटिव्ह; तुर्कीहून परतल्यावर हजारो पाहुण्यांची उपस्थिती असलेल्या विवाहसोहळ्याला लावली हजेरी
Coronavirus Outbreak (Photo Credits: IANS)

भारतात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) फैलाव झपाट्याने होत आहे. देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 724 झाली असून त्यापैकी सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जागरुकता असणे आणि सोशल डिस्टेंसिंग पाळणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान मुंबई उपनगरातील डोंबिवली (Dombivali) येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. डोंबिवली येथील एका 25 वर्षीय तरुणाला कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आले होते. हा तरुण तुर्कीहून परतला होता. मात्र त्यानंतर त्याने 1000 पाहुण्यांची उपस्थिती असलेल्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एमएनसी (MNC) मध्ये काम करणारा हा तरुण आपल्या 21 मित्रांसह तुर्कीला गेला होता. 15 मार्चला तो भारतात परतला. त्यानंतर अगदी चार दिवसात त्याने आपल्या भावाच्या लग्नात सहभाग घेतला.

या तरुणाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर विवाहसोहळ्याला हजेरी लावलेल्या लोकांची माहिती गोळा केली जात आहे. त्याचबरोबर तुर्कीला त्याच्यासोबत गेलेल्या मित्रांचा शोधही घेतला जात आहे. सध्या कोरोनाबाधित तरुणावर मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसंच त्याच्या कुटुंबियांनाची देखील चाचणी करण्यात येणार आहे. (Coronavirus in Maharashtra: नागपूर, गोंदिया मध्ये कोरोनाचे 5 नवे रुग्ण; महाराष्ट्रात कोरोना व्हायरसग्रस्तांचा आकडा 135)

गर्दीची ठिकाणं टाळा, विवाहसोहळ्यांसह इतर सोहळे पुढे ढकलण्याचं आवाहन सरकारकडून वारंवार करण्यात आलं होतं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत हा विवाहसोहळा पार पडल्याचे बोलले जात आहे. लग्नानंतर कोरोना व्हायरसची काही लक्षणे आढळल्याने तो तरुण डॉक्टरांकडे गेला आणि त्याला संक्रमण झाल्याचे सिद्ध झाले. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 135 झाला आहे. दिवेंसदिवस या संख्येत वाढ होत असल्याने खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.