कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटापासून नागरिक दूर राहावेत यासाठी महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) विविध माध्यमातून जनजागृती करत आहेत. सध्या प्रभावी मानला जाणारा सोशल मीडिया (Social Media) हा पर्यायही पोलीस वापरत आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कोरोना व्हायरस संकटापासून दूर राहण्यासाठी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक हटके संदेश दिला आहे. त्यात भारतभर लोकप्रिय ठरलेल्या 'सैराट' (Sairat Movie) या मराठी चित्रपटातील दोन प्रमुख पात्रांचा आधार घेतला आहे. परश्या आणि आर्ची अशी हो दोन पात्रं आहेत. त्यात आर्ची आणि परश्या यांच्या तोंडी कोरोनाबाबतची विधाने टाकून पोलिसांनी जनजागृती केली आहे.
महाराष्ट्र पोलिसांची ट्विट
महाराष्ट्र पोलीसांनी आपल्या @DGPMaharashtra या ट्विटर हँडलवरुन एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''परश्या इथून थेट घरी जाणार आहे...थेट घरी! कारण आरची म्हणली कोरोनापासून सुरक्षित रायचं असल तर घराबाहेर निघू नको''. मजशीर असे की पोलीसांनी हे ट्विट करताना एक इमेजही वापरली आहे. या इमेजमध्ये परश्या, सल्या आणि लंगड्या दिसत आहेत. खरेतर हे 'सैराट' चित्रपटातील एक दृश्य आहे. (हेही वाचा, Coronavirus: जबाबदार नागरिक व्हा, इडियट नाही - महाराष्ट्र पोलीस)
परश्या इथून थेट घरी जाणार आहे...थेट घरी!
कारण आरची म्हणली कोरोनापासून सुरक्षित रायचं असल तर घराबाहेर निघू नको.#StayHome #StaySafe#BaherNighuNako pic.twitter.com/goK9IRrVdc
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) June 24, 2020
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी विचारात घेता ती हळूहळू मोठ्या प्रमाणावरवाढत आहे. शेवटची अद्ययावत माहिती हाती आली तेव्हा महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 1,39,010 इतकी आहे. त्यात आतापर्यंत बरे झालेल्या 69,631 आणि मृत्यू झालेल्या 6,531 जणांचाही समावेश आहे.