Picture of foot over bridge outside CSTM that collapsed on March 14 (Photo Credits: ANI)

मुंबई (Mumbai) च्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Terminus) जवळील पादचारी पूल काल (गुरुवार, 14 मार्च) संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत 6 लोकांचा मृत्यू झाला तर 36 जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेवर अनेक चर्चा होत असताना या पुलाबद्दलची खास माहिती समोर आली आहे. या पुलाला कसाब ब्रिज असेही म्हटले जाते. नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान कसाबने या कामा हॉस्पिटलमध्ये (Cama Hospital) जाण्यासाठी या पुलाचा वापर केला होता. तेव्हापासून या पुलाला 'कसाब ब्रिज' (Kasab Bridge) असेही म्हटले जाते.

काल झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. अनेक राजकीय नेते या दुर्घटनेबद्दल आपली प्रतिक्रीया नोंदवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करत पीडितांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे.

पूल कोसळून मुंबईकरांचे बळी जाण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही सप्टेंबर 2017 मध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकाजवळील चेंगराचेंगरीत अनेक मुंबईकरांना जीव गमवावा लागला होता. त्यानंतर जुलै 2018 साली अंधेरीतही असाच एक पादचारी पूल कोसळला होता.