महाराष्ट्रातील कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाला तोंड देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीची (CM’s Covid-19 Relief Fund) स्थापना केली होती. आता या निधीत जमा झालेल्या 541.18 कोटींपैकी आतापर्यंत फक्त 132.25 कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता कोविड-19 च्या खात्यातून परप्रांतीय कामगारांच्या रेल्वे भाड्यावर सर्वाधिक 88.64 कोटी रुपये खर्च झाले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली (RTI) ही माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 च्या खात्यात जमा केलेली रक्कम आणि त्यापैकी किती रक्कम खर्च झाली याची माहिती मागितली होती. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
यावर मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने सांगितले की, कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत 541.18 कोटी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले गेले आहेत. सीएमओ फंड आणि त्याच्या खर्चाबाबत सीएमओच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘साथीच्या रोगाबाबत फारशी अनिश्चितता असल्याने निधी खर्च करण्याबाबत सतर्क आहेत. येणाऱ्या काळात साथीच्या रोगाची तीव्रता, परिस्थिती गंभीर झाल्यास राज्याकडे खर्च करण्यासाठी निधी असणे आवश्यक आहे. म्हणून केवळ विशिष्ट हेतूंसाठी निधी वापरला जात आहे. सीएम फंड हा एक फंड आहे जो ताबडतोब वापरला जाऊ शकतो, मात्र त्यासाठी फक्त मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक आहे. म्हणून आम्ही जास्त पेपर वर्क आणि प्रक्रिया न करता आणीबाणीसाठी त्याचा वापर करू शकतो.' (हेही वाचा: शिवसेनेचे सर्व खासदार आणि आमदार 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार- संजय राऊत)
दरम्यान या फंडापैकी, 20 कोटी सेंट जॉर्ज रुग्णालयाला, 3.85 कोटी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाला, औरंगाबाद रेल्वे अपघात झालेल्या पीडित व्यक्ती किंवा नातेवाईकांना राज्यात 80 लाख रुपये देण्यात आले. त्याशिवाय जालना आणि रत्नागिरीतील कोविड प्रयोगशाळेत वैद्यकीय शिक्षण विभागाला प्रत्येकी 1 कोटी 7 लाख रुपये, कोरोना रूग्णांच्या प्लाझ्मा उपचारांसाठी 16.85 कोटी रुपये देण्यात आले आहेत.