शरद पवार यांच्या गावी जाणार उद्धव ठाकरे; बारामतीत मुख्यमंत्र्यांचं स्वागत होणार दणक्यात
उद्धव ठाकरे आणि शरद पवार पत्रकार परिषद (Photo Credits-ANI)

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजकारणात प्रवेश केल्यानंतर पाहल्यांदाच शरद पवार यांच्या गावी म्हणजेच बारामतीला जाणार आहेत. बारामतीत शारदानगर येथील ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या ‘कृषिक’ या शेतीविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उदघाटनानिमित्तच मुख्यमंत्री बारामतीत जाणार आहेत. त्यांच्या उपस्थितीविषयीची माहिती ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी माध्यमांना दिली आहे. शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमात नक्की काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हा उदघाटनाचा कार्यक्रम येत्या 16 जानेवारीला गुरूवारी सकाळी 9 वाजता पार पडणार आहे. तर कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कृषीमंत्री दादा भुसे, पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार सुप्रिया सुळे, इस्त्राईलचे राजदूत व आंतरराष्ट्रीय धोरण सल्लागार डॅन अलुफ आदी मान्यवर उपस्थित असतील.

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील जर...' वरिष्ठ कॉंग्रेस नेत्याने दिला इशारा

दरम्यान, राजेंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वी सकाळी 8 वाजता शारदानगर येथे एक महत्वपूर्ण उच्चस्तरीय संशोधक बैठक पार पडणार आहे. या बैठकीला, केंद्रीय शेती संशोधन भरती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. माई, राज्याचे कृषी प्रधान सचिव डॉ.एकनाथ डवले, राज्याचे कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, बायरचे आशिया प्रमुख डॉ. सुहास जोशी, अटारीचे संचालक डॉ. लाखनसिंग, भारतीय कृषी संशोधन परीषदेचे माजी महासंचालक डॉ.ए.के. सिंग, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. लक्ष्मीनारायण मिश्रा, राहूरी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक धवन, कोकण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस.डी. सावंत, नागपूरच्या म्हापसूचे कुलगुरू डॉ. आशिष पाथुरकर यांच्यासह राज्य व देशातील 100 हून अधिक संशोधक उपस्थित असणार आहेत.