महाराष्ट्रात गेले कित्येक दिवस चर्चा सुरु असलेल्या विधान परिषद निवडणुकीची अखेर घोषणा झाली. त्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आमदारकीचा अर्ज दाखल केला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या 4 अन्य उमेदवारांनी देखील आपला अर्ज दाखल केला आहे. आज राज्यात या गोष्टीची चर्चा होतीच मात्र त्यासोबत सर्वांचे डोळे लागले होते ते मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या त्यांच्या संपत्तीच्या विवरणाकडे. सीएम उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्याकडे जवळपास 125 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. मात्र अद्याप त्यांचे हे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेले नाही.
महाराष्ट्रामध्ये ठाकरे घराण्याबाबत नेहमीच लोकांना उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. त्यात मुख्यमंत्र्यांची संपत्ती नेमकी किती असेल? याबाबत प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते. तर आज विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने याबाबत माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे यातून उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे असे एकही वाहन नसल्याचे समोर आले आहे.
उद्धव ठाकरे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे मुंबई येथे दोन बंगले आहेत- पश्चिम उपनगर वांद्रे कलानगर येथील मातोश्री बंगला, तसेच तिथून जवळच नव्याने बांधलेला बंगला. यासह कर्जत येथील फार्महाऊस याचा तपशील त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिला आहे. विविध कंपन्यांचे असलेले शेअर्स, बँकेमधल्या ठेवी, कंपन्यांमध्ये असलेली भागीदारी हा आपल्या उत्पन्नाचा स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध पोलिसांमध्ये 23 प्रकरणे होती, त्यापैकी 12 प्रकरणे निकाली लागली व अन्य खासगी तक्रारी आहेत. यातील एक प्रकरण म्हणजे, नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा राणेंची सामनाबाहेर सभा होती. त्यावेळी शिवसेना विरुद्ध राणे समर्थक असा राडा झाला होता. पोलीस स्टेशनमध्ये याबाबतच्या गुन्ह्याची नोंद आहे.
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभा निवडणूक लढविताना, त्यांच्याकडे 11 कोटी 38 लाखांची संपत्ती असल्याचे नमूद केले होते. त्यात 10 कोटी 36 लाखांच्या बँकेंमध्ये असलेल्या ठेवी, 64 लाख 65 हजारांचे दागिणे आणि एक BMW कार यांचा समावेश आहे.
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर येत्या 14 मे पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तर 21 मे रोजी मतदानाची तारीख आहे.