Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटकाळात अगोदरच चिंतेचे आणि तणावाचे वातावरण असताना काही समाजकंटकांचा व्हायरस सुद्धा पसरत आहे, खोट्या आणि चिथवणार्‍या  व्हिडिओच्या माध्यमातून काही मंडळी समाजात दुही निर्माण करू पाहत आहे मात्र महाराष्ट्राची जनता, राजकीय मंडळी कोणताही भेदभाव न करता एकत्र सरकारच्या पाठीशी उभी आहेत त्यामुळे या समाजघातक संकटाला उलथवून लावून महाराष्ट्राच्या जनतेचे रक्षण करू असा ठाम विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून व्यक्त केला आहे. अलीकडेच एक इसम नोटांना थुंकी लावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यांचा दाखला देताना उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडली आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही ठरला जाईन असेही त्यांनी आपल्या लाईव्ह दरम्यान म्हंटले आहे. उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्ह मधील काही महत्वाचे मुद्दे पाहुयात

  • सर्वात प्रथम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आराध्या नामक एका 7 वर्षीय मुलीचे कौतुक केले आहे, या चिमुकलीने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान केले आहे, अशी माहिती देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आराध्याच्या भावनेचे कौतुक केले. आणि अशीच साथ राहिल्यास आपण कोरोनाचा लढा जिंकलोच असा विश्वास सुद्धा व्यक्त केला आहे.
  •  समाजकंटकांनी खोटे व्हिडीओ व्हायरल करून महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, अशांना कायद्याच्या कचाट्यातून सुटू देणार नाही असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
  •  मरकज मध्ये महाराष्ट्रातील उपस्थिती लावणाऱ्या सर्वांची माहिती मिळवून त्यांना विलगीकरण कक्षात सुरक्षित ठेवण्यात आले आहे असे सांगतानाच उद्धव यांनी अन्य संशयितांची माहिती असल्यास ती सुद्धा द्यावी असे आवाहन केले आहे.
  • पुढील सूचना मिळेपर्यंत महाराष्ट्रात राजकीय, धार्मिक, क्रीडा संबंधी किंवा कोणताही उत्सव पार पडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
  • राज्यातील स्थलांतरित मजूर व गरजूंची सोय करण्यात आली असून राज्यात तब्बल 5  लाख गरजूना विविध केंद्रातून जेवण व वैसकीय सुविधा मिळतील अशी सोय केलेली आहे. महाराष्ट्राचे जे नागरिक इतर राज्यात आहे त्यांची सोय करण्यासाठी सुद्धा त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यात आली आहे.
  • मुंबईत केवळ कोरोना विशेष रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, न्यूमोनियाची लक्षणे असतील तर सर्वसामान्य हॉस्पिटल मध्ये जाऊ नका त्याऐवजी कोव्हीड साठी तयार करण्यात आलेल्या चाचणी रुग्णालयात जा. असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
  •  कोरोनाचे कॉमन टार्गेट हे अन्य व्याधी असणारे ज्येष्ठ आहेत त्यामुळे घरातील ज्येष्ठांची काळजी घ्या, हात धुवून मगच त्यांची सेवा करा.
  • कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे पण परिस्थिती अजूनही हातात आहे, चाचणीची संख्या वाढल्याने आता रुग्णांची संख्या वाढत आहे असेही उद्धव यांनी सांगितले आहे.
  • कोरोना आपली परीक्षा बघतोय, पण हा एक छोटासा जीव आपले काहीही बिघडवू शकत नाही, आत्मविश्वास, धैर्य, संयम बाळगा. हा संयमाचा खेळ आहे ज्याने त्याचा खेळ संपला असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी लॉक डाउन संबंधी भाष्य करताना, लोकांनी 14 एप्रिल पर्यंत नियमाचे नीट पालन केल्यास लॉक डाऊन वाढवण्याची वेळ येणार नाही , त्यामुळे परिस्थिती कशी होईल हे आता लोकांवरच निर्धारित आहे असे सांगितले आहे.