CM Eknath Shinde On Employment: कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळवून देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
Eknath Shinde | (Photo Credit - Facebook)

CM Eknath Shinde On Employment: कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार (Employment) मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या ‘मी मुंबई अभियान’ अंतर्गत ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का? यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे असलेले प्रकल्प स्वीकारावेत, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, तसेच इतर मान्यवर आणि अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. नेस्को सेंटर, गोरेगाव येथे आयोजित हा महोत्सव चार दिवस चालणार आहे.

या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला दिशा आणि गती देण्याचे काम केले जात आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी उपलब्ध आहे. काजू, आंबा, मत्स्यव्यवसाय यांच्यासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. कोकणचे वैभव जपणे सर्वांचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊनच कोकणासाठी विविध पर्यावरणपूरक योजना, प्रकल्प, उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. (हेही वाचा - Sanjay Raut on CM Eknath Shinde: स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले- संजय राऊत)

निसर्गसमृद्ध कोकणाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा हा महोत्सव असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. लहरी हवामानामुळे कोकण किनारपट्टीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यातून सावरण्याचे बळ देण्याबरोबरच स्थानिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचेही ते म्हणाले. तरूणांना रोजगार उपलब्ध करून कोकणचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार - उपमुख्यमंत्री फडणवीस

कोकण ही नररत्नांची खाण आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या कला, संस्कृती, वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे दर्शन होत असून येत्या काळात अधिक चांगल्या आणि पर्यावरणपूरक योजना राबवून कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

बंदरे, मासेमारी, विविध उद्योग, पर्यटन विकासासह स्थानिकांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा निर्धार आहे. हा महोत्सव म्हणजे कोकणच्या समृद्धी आणि विकासासाठी आवश्यक व्यक्तींचे एकत्रित संमेलन असून राज्य शासन कोकणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. त्याबरोबरच “कोकणातला आंबा अधिक गोड की माणूस” असा प्रश्न पडतो अशा शब्दात कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाचे कौतुक फडणवीस यांनी केले. (हेही वाचा - CM Eknath Shinde on Devendra Fadnavis: 'सेल्फ गोल' करत एकनाथ शिंदे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचा 'लाडके मुख्यमंत्री' असा उल्लेख (Watch Video))

काजूच्या उत्पादनात कोकणची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता

काजूसारख्या उत्पादनात कोकणची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे नारळ, मत्स्यपालन, आंबा प्रक्रिया, पर्यटन, वन उत्पादने असे विविध उद्योग हे कोकणचे वैभव असून प्रत्येक जिल्ह्याची गरज ओळखून त्या उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नमूद केले. यावेळी कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, झाशीच्या राणीचे वंशज राजू नेवाळकर यांच्यासह कोकणच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.