काँग्रेस सरकारच्या 15 वर्षाच्या सत्तेपेक्षा दुप्पट काम 5 वर्षात केलं; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits: PTI)

विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) तयारीसाठी आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांनी आजपासून अमरावती (Amravati) पासून महाजानदेश यात्रेला (Mahajanadesh Yatra) सुरुवात केली. यावेळेस संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांच्या उपस्थितीत गुरुकुंज मोझरी येथे सभा घेतली. या सभेत बोलत असताना त्यांनी मागील पाच वर्षात भाजप-शिवसेना युती सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोगा मांडला आणि त्याचवेळी पूर्व सत्तेतील काँग्रेस-राष्ट्रवादीवर शाब्दिक हल्ला सुद्धा केला.

महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहोत. जनता दैवत आहे. जनता मालक असून आम्ही जनतेचे सेवक आहोत, असं सांगत या जनतेचा आशीर्वाद घेऊनच आम्ही गेल्या पाच वर्षात दुप्पट-तिप्पट काम करू शकलो. आमच्या सरकारने राज्यात उद्योग आणले. आघाडीने गेल्या 15 वर्षात काय काम केलं? ते त्यांनी सांगावं, असं आव्हान त्यांनी केलं.

ANI ट्विट

मागील काही दिवसांपासून विरोधी पक्षातील अनेक आमदार खासदार मंडळी पक्षांतर करून भाजपा मध्ये प्रवेश घेत आहेत. या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी आता जागा फुल्ल झाली असून यापुढे भाजपात भरती होणार नाही असा इशारा दिला.

दरम्यान, आजच्या सभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यंदाच्या निवडणुकीत भाजपाला नक्कीच विजय प्राप्त होणार आणि मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा विराजमान होणार असा विश्वास दर्शवला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी 'अब की बार 220 पार'चा नारा दिला. कोणत्याही परिस्थितीत 220 जागा निवडून आणायच्याच, असा निर्धारही भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला.