राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 'ठगबाजीची चार वर्षे' असे पोस्टर विरोधकांनी झळकवले. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना 'ठग' संबोधलं होतं. विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हा पोरकटपण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी गंभीर होण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र'; विरोधकांनी झळकवले पोस्टर
अलिकडेच आलेल्या आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाच्या पोस्टरची कॉपी करत 'ठग्स ऑफ महाराष्ट्र' चं पोस्टर तयार करण्यात आलं. विरोधकांकडे विरोध करण्यासाठी मुद्दे उतरले नसल्याने त्यांना अशा प्रकराची फिल्मीगिरी सूचत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
तसेच मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "पत्रकार परिषदेत उपस्थित केलेले प्रश्न हे आमच्या काळात निर्माण झालेले नाहीत. तर विरोधकांची सत्ता असताना हे प्रश्न उपस्थित झाले होते. त्या प्रश्नांची उत्तरे आम्ही आजही देत आहोत. तसंच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला आम्ही प्रभावीपणे उत्तरे दिली आहेत आणि यापुढेही देऊ."
कसे होते पोस्टर ?
विरोधकांच्या पत्रकार परिषदेत बॅकग्राऊंडला हे पोस्टर होते. आमिर खान, अमिताभ बच्चन यांच्या 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाच्या पोस्टरची कॉपी करत 'ठग्स ऑफ महाराष्ट्र' चं पोस्टर तयार करण्यात आलं होतं. त्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना 'ठग्स ऑफ महाराष्ट्र' असं संबोधलं होतं. पोस्टरमध्ये दोघांच्याही हातात तलवार दाखवण्यात आली होती.