गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात हाहाकार माजवलेल्या पावसाने येथील भागात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण केली आहे. या संकटसमयी बचावकार्य जरी धाऊन आले असले तरीही येथील पूरग्रस्तांना मदत पोहोचण्यासाठी बचावकार्याला देखील ब-याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील बिकट परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) कोल्हापूरात दाखल झाले असून हेलिकॉप्टरने येथील पूरग्रस्त जिल्ह्यांची पाहणी करायला सुरुवात केली आहे.
देवेंद्र फडणवीसांसोबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंसाधन मंत्री गिरीश महाजन आणि पालक मंत्री एकनाथ शिंदे देखील या जिल्ह्यांचा आढावा घेणार आहेत.
CMO महाराष्ट्र ट्विट:
CM @Dev_Fadnavis’ aerial survey to review the flood situation of Sangli and Kolhapur begins.
Ministers Chandrakant Patil, Girish Mahajan, Eknath Shinde too present.#Maharashtrafloods pic.twitter.com/XefMfsW30M
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 8, 2019
पूरग्रस्तांना सरकार योग्य ती मदत नक्की करेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच पूरात नुकसान झालेल्या पीकांचा आढावा घेऊन मदत जाहीर केली जाणार आहे. आरोग्य यंत्रणेलादेखील सज्ज राहण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतून तात्काळ औषध पुरवठा केला जाणार असल्याचं आणि त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती दिली आहे.
तसेच येथील पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हळूहळू पाण्याचा निचरा होण्यास सुरूवात झाली आहे. मात्र रस्ते वाहतूक ठप्प असल्याने आता नागरिकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेची सोय सुरू करण्यात आली आहे. आजपासून(8 ऑगस्ट) पुढील 3 दिवस मिरज-कराड मार्गावर विशेष लोकल चालवली जाणार आहे.