CM Devendra Fadnavis & Saif Ali Khan | Photo Credits: X@ ANI and Insatgram

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर मुंबई मध्ये वांद्रे भागात राहत्या घरी हल्ला झाला आहे. मुंबई पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला घरात चोरी करायला आलेल्या उद्देशातून झाला आहे. मात्र सैफ वर 6 वेळेस हल्ला झाल्याने याबाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच विरोधकांनी सरकारवर तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'अभिनेता सैफ वर झालेला हल्ला नेमका कशातून झाला? त्यामध्ये कोणत्या गोष्टी होत्या याची माहिती पोलिसांनी दिली आहे.' तर केवळ सैफ वरील हल्ल्यावरून मुंबई हे असुरक्षित शहर असल्याचं म्हणणं चूकीचं असल्याचं ते म्हणाले आहेत.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आप पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी सैफ वरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. "अशा घटना घडतात आणि त्यांची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे; परंतु अशा घटनांच्या आधारे मुंबईला असुरक्षित म्हणणे चुकीचे आहे," असे फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची सैफ वरील हल्ल्यावर प्रतिक्रिया

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर रात्रीच त्याला वांद्रे येथील लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर तातडीने दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी काढला आहे. तर मानेवर प्लॅस्टिक सर्जरी केली आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे आणि सैफ आयसीयू मध्ये असल्याची माहिती दिली आहे. (हेही वाचा: Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक, शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया).

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. सैफच्या घरी काम करणार्‍या दोन महिला कर्मचार्‍यांच्या जबाबावरून तपास सुरू झाला असून लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असं पोलिसांनी सांगितलं आहे.