CIDCO Lottery: सिडको कडून लवकरच नव्याने 89 हजार घरांची लॉटरी निघणार
सिडको । Photo Credits: Twitter/ DrSanMukherjee

म्हाडा (MHADA)  प्रमाणेच नवी मुंबई मध्ये सामान्य मुंबईकरांच्या बजेटमध्ये स्वप्नातील घरं आणण्यासाठी CIDCO लॉटरी जाहीर केली जाते. कोरोना संकट काळातही सामान्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी सरकार कडून विशेष प्रयत्न करण्यात आले. दरम्यान आज (1 जुलै) सिडको महामंडळाने 2018-19 रोजी महागृहनिर्माण योजने अंतर्गत अंदाजे 15 हजार घरांसाठी लॉटरी काढली होती त्यातील भाग्यवान विजेत्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घरांचे वाटप कऱण्यात आले. ही घरं कळंबोली भागातील आहेत.  यावेळीच सिडकोचे एमडी संजय मुखर्जी यांनी भविष्यात आता अजून 89 हजार घरांची लॉटरी जाहीर केली जाऊ शकते अशी माहिती देत घराचं स्वप्न पाहणार्‍यांना नवी आशा दिली आहे.

सिडको कडून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 2018-19 मध्ये घरांची लॉटरी काढण्यात आली होती. नवी मुंबईत ही घरं घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या 5 भागात 11 ठिकाणी बांधण्यात आली. यापैकी 100 विजेत्यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घरांचे वाटप करण्यात आले. अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटात बांधण्यात आलेल्या या घरांसोबत सर्व सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. या घरांसाठी 5 वर्षे कोणताही मेंटेनन्स लागणार नाही. या घरासाठी केंद्र आणि राज्य यांचा हिस्सा अद्याप सिडकोला प्राप्त झालेला नसला तरीही कोविडच्या अवघड काळात व्यवस्थित हफ्ता भरणाऱ्या लोकांना ही घरं देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

दरम्यान नव्याने बांधल्या जाणार्‍या सिडकोच्या घरांचे प्रोजेक्ट हे पनवेल मध्ये असण्याची शक्यता आहे. मुंबई प्रमाणेच आता नवी मुंबई मध्येही वेगाने विकास होत आहे. येत्या काही वर्षात नवी मुंबई मध्ये विमानतळ देखील सुरू होणार आहे. त्याचे काम देखील सुरू आहे. त्यामुळे अनेक जण नवी मुंबई मध्येही घरांसाठी उत्सुक आहेत.