CIDCO (संग्रहित संपादित प्रतिमा)

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाने (CIDCO) 27 ऑगस्ट रोजी खारघर येथील गृहसंकुलांमधून 689 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या होत्या. आता, विकास प्राधिकरणाने या गृहनिर्माण योजनेंतर्गत अतिरिक्त 190 सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, अर्जांची ऑनलाइन नोंदणी करण्याची मुदत 25 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सिडकोने 27 ऑगस्ट रोजी गृहनिर्माण योजना सुरू केली होती आणि आपल्या स्वप्नपूर्ती, व्हॅली शिल्प व वास्तुविहार-सेलिब्रेशन हाऊसिंग कॉम्प्लेक्समधून खारघर नोडमधील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग (EWS), निम्न उत्पन्न गट (LIG), मध्यम-उत्पन्न गट (MIG), आणि उच्च उत्पन्न गटासाठी (HIG) 689 सदनिका उपलब्ध करून दिल्या होत्या.

यामध्ये आता, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागासाठी स्वप्नपूरी गृहनिर्माण संकुलात अतिरिक्त 93 सदनिका, मध्यम-उत्पन्न गटासाठी वास्तुविहार-सेलिब्रेशन गृहसंकुलात 46 सदनिका आणि उच्च उत्पन्न गटासाठी 51 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सदनिकांसाठी अर्जांची ऑनलाइन नोंदणी करण्याची अंतिम मुदत 25 ऑक्टोबर 2024, 20.00 पर्यंत वाढवण्यात आली आहे आणि ईएमडी (EMD) भरण्याची तारीख 30 ऑक्टोबर 2024, 23.59 पर्यंत वाढवण्यात आली आहे. (हेही वाचा: CIDCO Lottery: सिडको लॉटरी आणि घरांबाबत मोठी बातमी; महामंडळाकडून महत्त्वाचा निर्णय)

संगणकीकृत लॉटरीची सोडत 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता काढण्यात येईल. ऑनलाइन नोंदणी, सुधारित वेळापत्रक आणि योजनेच्या तपशीलवार माहितीसाठी अर्जदार https://lottery.cidcoindia.com या वेबसाइटला भेट देऊ शकतात. सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'यासोबतच घणसोली, खारघर आणि कळंबोली नोड्स येथील सिडकोच्या सामूहिक गृहनिर्माण योजनेतील सदनिकाही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी संगणकीकृत लॉटरी सोडत पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 10 ऑक्टोबर रोजी काढली जाईल.'