राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावर (CM Uddhav Thackeray) विराजमान झाल्यावर, अनेक नवीन योजना राबवण्यात आल्या आहेत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, 'आपला दवाखाना' (Aapala Dawakhana) चे लोकार्पण करण्यात आले. आपने दिल्लीमध्ये राबवलेल्या मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर आधारीत 'आपला दवाखाना' (ई-हेल्थ स्मार्ट क्लिनिक) ही संकल्पना असणार आहे.
ठाणे महानगरपालीकेने (TMC) पुढाकार घेऊन ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सुरुवातीला दोन दवाखाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर ते यशस्वी झाल्यावर आणखी 50 ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरु होतील, असे नियोजन आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे "आपला दवाखाना" चे लोकार्पण करण्यात आले. pic.twitter.com/zkLrfnA9ia
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2020
'आपला दवाखाना' ही संकल्पना गरजू आणि गरीब लोकांना डोळ्यासमोर ठेऊन सुरु केली गेली आहे. यामध्ये गरजू रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यासोबतच रक्त तपासणी, शुगर, ईसीजी आदी चाचण्या विनामूल्य करण्याचे नियोजन आहे. यासाठी 160 कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. ही संकल्पना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. त्यानुसार त्यांच्याच हस्ते प्रायोगित तत्वावर दोन दवाखान्यांचा शुभारंभ झाला होता. मात्र काही कालावधीतच या दवाखान्यांची बिकट अवस्था झाली. आता आज प्रातिनिधिक स्वरूपात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ओवळा येथील आपला दवाखान्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे.
सध्या ठाणे शहरातील गरजूंसाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि इतर 27 आरोग्य केंद्रांमध्ये अल्प दरात उपचार दिले जातात. मात्र या केंद्रांची संख्या अपुरी अडू लागली आहे. त्यामुळेच 'आपला दवाखाना' संकल्पना उदयास आली. त्यानंतर दोन ठिकाणी हे दवाखाने सुरु झाले, ज्यांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता अजून 50 दवाखान्यांचे नियोजन आहे. यामध्ये प्रतिदिन 100 रुग्ण येतील असा अंदाज आहे.