
मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंततर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. तसेच, कोरोना व्हायरस (Coronavirus) आदी कारणांमुळेही काळजी घ्यावी लागत होती, अशी माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे. मुंबई उपनगर येथे पालकमंत्री म्हणून झेंडावंदन झाल्यानंतर आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री पुन्हा एकदा 'Back in Action' मोडमध्ये आल्याचे म्हटले आहे.
मुंबई शहरातील एका क्रीडांगणाला टीपू सुलतान नाव दिल्याची चर्चा आहे. याबाबत प्रसारमाध्यांनी आदित्य ठाकरे यांना विचराले असता, 'एखाद्या क्रीडांगणाला काय नाव द्यायचे हा महापालिकेचा अधिकार आहे. महापालिकेत असा काही ठराव झाल्याचे अद्याप तरी आमच्यापर्यंत आले नाही', असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. आज प्रजासत्ताक दिन आहे. त्यामुळे आज तरी आपण राजकारणासारख्या इतर विषयावर नको बोलुया, असे म्हणत या विषयावर विशेष भाष्य करणे आदित्य ठाकरे यांनी टाळले.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचे निमित्त साधत मुख्यमंत्री आज पुन्हा एकाद सक्रीय झाल्याचे दिसले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यासोबत झेंडावंदन कार्यक्रमाला ते उपस्थित राहले. त्यांच्यावर झालेल्या स्पाईन सर्जरीनंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते जाहीर कार्यक्रमाला उपस्थित राहात नव्हते. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही ते उपस्थित राहिले नव्हते. मात्र, आता ते जवळपास अडीच महिन्यांनंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे पार पडणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मुंबई येथील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर काहीकाळ रुग्णालयात उपचार घेतल्यावर मुख्यमंत्र्यांना 2 डिसेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तेव्हापासून ऑनलाईन बैठका, कार्यक्रम वगळता इतर कोणत्याच बैठका, कार्यक्रमाला मुख्यमंत्री जाहीरपणे उपस्थित राहिले नाहीत. तसेच, मोजके लोक वगळता कोणालाच भेटलेही नाही. या अनुपस्थितीवरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जाहीर टीका केली होती.