मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली Amit Shah यांची भेट; साखर उद्योगाला सशक्त करण्यासंदर्भात झाली सकारात्मक चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Photo Credit : ANI)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही बैठक नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या गृह मंत्रालयात झाली. बैठकीत महाराष्ट्राशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साखर उद्योगाला बळकटी आणि सक्षम करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. त्याचा महाराष्ट्रातील साखर उद्योग आणि शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल.

महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय सहकारमंत्री घेतील, असे ते म्हणाले. दुसरीकडे, बैठकीनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 26 जानेवारीबाबत राज्य सरकारची सुरक्षा व्यवस्था चोख आहे. पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क असून 26 जानेवारीला कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी अपेक्षा आहे.

केंद्रीय सहकार मंत्र्यांचे आभार मानत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, सहकार क्षेत्रातबाबत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. आजच्या बैठकीत नफेवारी (मार्जिन मनी) खेळते भांडवल (Working Capital)  कर्जाची पुनर्रचना, आयकर प्रलंबित विषय, इथेनॉल, आणि कोळसा निर्माण या सारख्या साखर उद्योगाशी निगडीत समस्यांच्या उपाययोजनेवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली असल्याचे, मुख्यमंत्री शिंदे यांनी अधोरेखित केले.

येत्या काही दिवसात केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून सकारात्मक उपाय आखले जातील, साखर व सहकाराविषयी योग्य निर्णय केंद्राकडून घेतले जातील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. याचा लाभ राज्यातील साखर, सहकार उद्योगाला आणि शेतकऱ्यांना होईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

राज्‍यातून समुद्र वाहतूकीद्वारे निर्यात केली जाते. समुद्री वाहतुकीद्वारे होणाऱ्या निर्यातीचा टक्का तुलनेने कमी आहे, आज झालेल्या बैठकीत या संदर्भात चर्चा करण्यात आली असून समुद्र मार्गे होणाऱ्या निर्यातीचा टक्का केंद्र शासनाकडून वाढवून मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर माध्यमांना दिली.

ते पुढे म्हणाले, राज्यात अनेक बंदरे आहेत. ज्यातून निर्यात होत असते. मात्र, राज्याचा निर्यातीचा टक्का तुलनेने कमी आहे. तो वाढवून मिळण्याबाबत आज केंद्रीय गृह व सहकार मंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाली असल्याचे सांगत, राज्याचे टक्केवारी येत्या काळात अधिक वाढवून मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले. (हेही वाचा: 'पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील'- CM Eknath Shinde

सहकाराच्या मुलभूत अशा प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थे (पॅक्स) च्या बळकटीकरणाची योजना केंद्र शासनाने हाती घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगून विविध 20 मुद्यांच्या माध्यमातून पॅक्सला सशक्त केले जाईल. याद्वारे पॅक्सचे येत्या काळात कृषी आधारित व्यापार संस्थेत परिवर्तन होईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. याबाबत राज्याने पुढाकार घ्यावा, अशा सूचना केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या कडून देण्यात आल्याचे सांगितले. यावर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेतील, अशी माहिती,  उप‍मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.)