सध्या सर्वोच्च न्यायालयात असलेल्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्यात विरोधक आक्रमक झाले आहेत. याच मुद्यावरुन खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhajiraje Chhatrapati) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिलं आहे. संभाजीराजे यांनी ट्विटच्या माध्यमातून हे पत्र शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, "मराठा आरक्षण सुनावणी प्रश्नी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून काही कायदेशीर व तांत्रिक बाबी स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केला आहे. या पत्राची प्रत शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सह मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांना देखील दिलेली आहे."
या पत्रातून संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबतीत कायदेशीर आणि तांत्रिक बाबी मुद्देसुद मांडल्या असून मराठा आरक्षण सुनावणी लांबल्यास समाजामध्ये असंतोष वाढू शकतो, असे सूचितही केले आहे. त्यामुळे पुढील सुनावणीमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा न करता मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने कटिबद्ध राहावे, असेही ते म्हणाले.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं ट्विट:
...विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेसह मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनादेखील दिलेली आहे.
(2/2)
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 14, 2021
दरम्यान, काही दिवसांपूर्वी 'मराठा समाजाला आरक्षण द्या अथवा आम्हास विष पिऊन मरु द्या,' असे संतप्त ट्विट खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. तसंच 'तातडीने मराठा आरक्षणचा निकाल लावा. अन्यथा खुर्च्या खाली करा,' असंही ते म्हटलं होते. त्यानंतर काही वेळाने त्यांनी 'मी विष पिणार नाही, त्यांना विष पाजणार,[ असं म्हणत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान, 8 मार्चपासून मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु झाली असून 18 मार्चपर्यंत ही सुनावणी सुरु राहणार आहे.