छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar Crime News) जिल्ह्यातील अख्ख कृषी अधिकारी कार्यालय (Agricultural Officer) लाचखोरीत रंगल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) केलेल्या कारवाईत या कृषी कार्यालयातील तीन महत्त्वाचे अधिकारी (Agricultural Officer) आणि काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. कार्यालयातील सर्वांनाच अटक झाल्यामुळे घडल्या प्रकाराची जिल्हाभर चर्चा सुरु झाली आहे. तसेच, सरकारी कृषी खात्यामध्ये किती अनागोंदी आणि सर्वसामान्यांची ससेहोलपट सुरु आहे हे पुन्हा एकदा पुढे आले आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे घडल्या प्रकारावर काय कारवाई करणार याबाबत उत्सुकता आहे.
कृषी कार्यालयात विविध कामांसाठी लाच घेतली जात असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे प्राप्त झाली होती. प्राप्त तक्रारीवरुन एसीबीने केलेल्या कारवाईत हा धक्कादायक प्रकार पुढे आला. एबीपी माझा या खासगी वृत्तावाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कर्तव्यावर असेलल्या अधिकारी आणि कर्मचाऱअयांना एसीबीने कारवाई करुन अटक केली आहे. ठिबक सिंचन साहित्याच्या डिलरचे स्टॉक रजिस्टर तपासण्यासाठी तसेच अनुदानप्राप्त 35 फाईलसाठी 24 हजार 500 रुपयांची लाच घेताना एसीबीने ही कारवाई केली. (हेही वाचा, Mumbai: मध्यरात्रीनंतर मरीन ड्राईव्हवर बसण्यासाठी पोलिस घेतात लाच ? तरुणाचे ट्विट व्हायरल, तपास सुरू)
धक्कादायक म्हणजे एसीबीने केलेल्या कारवाईत वर्ग दोन श्रेणीत मोडणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. यात एका कंत्राटी ऑपरेटरचाही समावेश आहे. तालुका कृषी अधिकारी शिरीष रामकृष्ण घनबहादुर (वय 49 वर्षे), मंडळ कृषी अधिकारी विजयकुमार नरवडे (57 वर्षे), बाळासाहेब संपतराव निकम (57 वर्षे) आणि कंत्राटी ऑपरेटर सागर नलावडे (वय 24 वर्षे) अशी एसीबीने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्वांवर लाच घेतल्याचा आरोप आहे.
एसीबीने कारवाईबाबत माहिती देताना सांगितले की, विभागातील 35 शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोखरा) योजनेअंतर्गत कृषी ठिबक सिंचन साहित्य पुरविले होते. या साहित्याच्या डिलरचे रजिस्टर तपासण्यासाठी अधिकाऱ्यांकडून आर्थिक मोबदला नियमबाह्य पद्धतीने मागितला जात होता. याबाबत एका डिलरने एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीत कृषी विभागाचे अधिकारी प्रति फआईल 700 रुपये याप्रमाणे पैसे मागत होते. एकूण 35 फाईल होत्या. सर्व फाईल्सचे मिळून साधारण 24,000 रुपये इतकी रक्कम लाच म्हणून मागण्यात आली होती. परिणामी डीलरने एसीबीकडे तक्रार नोंदवली.