
छत्रपती संभाजी नगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) अंधारी गावात दोन ते तीन दिवसांपासून वानरांमुळे (Monkey) दहशतीचे वातावरण पहायला मिळत आहे. एका पिसाळलेल्या वानराने केलेल्या हल्ल्यात 11 ग्रामस्थ जखमी झाले आहेत. यात एका पाच वर्षांच्या मुलाला देखील वानराने जखमी केले आहे. या वानरांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तर वानराच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना गंभीर जखम झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जंगलातील पाणवठे आटल्याने तहानलेल्या वन्यप्राण्यांना आपली तहान भागविण्यासाठी मानवीवस्तींकडे कुच करत आहे. रात्रीच्या वेळेस हरीण, तडस, कोल्हे, खोकड, वानर हे प्राणी गाव परिसरात दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर वानरांनी गावात ठाण मांडले असून त्यांच्या धुमाकुळामुळे गावकरी त्रस्त झाले आहेत. दरम्यान अंधारी गावात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एक वानर पिसाळले असून, त्याने आतापर्यंत तब्बल 11 जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले आहेत. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लहान मुलांची विशेष कलजी घेण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे.
गावातील एकूण 11 जणांवर हल्ला करणाऱ्या पिसाळलेल्या वानराची तक्रार वन विभागाकडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने वन विभागातर्फे ठिकठिकाणी मोठमोठे पिंजरे लावण्यात आले होते. बुधवारी दुपारनंतर चार तासांच्या अथक परिश्रमानंतर पिसाळलेल्या वानराला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. मात्र इतर वानरांचा देखील वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.