
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)
आज (20 मे) मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी 10 च्या सुमारास मुंबईच्या राजभवनामध्ये हा सोहळा पार पडणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी नसलेले छगन भुजबळ तेव्हापासून नाराज होते, मात्र आता अखेर त्यांच्या पदरामध्ये मंत्रिपदाची माळ पडली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याचे पद रिकामं आहे. आता हीच जबाबदारी छगन भुजबळ यांच्याकडे दिली जाणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक महत्वाचे नेते आहेत. आज छगन भुजबळ यांच्या शपथविधी कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर नेते उपस्थित राहणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथ सोहळ्यामध्ये छगन भुजबळ यांचा समावेश झाल्याने राज्यात सध्या रिक्त असलेल्या नाशिकच्या पालकमंत्री पदासाठीची देखील चुरस वाढली आहे. (हेही वाचा, Maharashtra Cabinet Portfolio Allocation: अखेर राज्यातील खातेवाटप जाहीर, गृहखातं फडणवीस यांच्याकडेच तर अर्थ अजित पवारांकडे).
छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द
77 वर्षीय छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास शिवसेनेमधून सुरू झाला. नगरसेवक, मनपा मध्ये विरोधी पक्षनेता ते मुंबईचे महापौर झाले. पुढे राज्याचे महसुल मंत्री, उपमुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडी सरकार मध्येही ते मंत्री होते. मात्र एनसीपी मध्ये फूट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले आहेत.