Chhagan Bhujbal | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नाशिकमध्ये महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महायुतीत (Mahayuti) मात्र नाशिकच्या जागेचा तिढा अजूनही कायम आहे. यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीलाच घरचा अहेर दिला आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत तरी नाशिकच्या जागेवर उमेदवार जाहीर करा असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.  (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: 'महायुती च्या नेत्यांकडून लोकांना मत देण्यासाठी धमकी' - संजय राऊतांचा महायुती वर मोठा आरोप)

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी जोर लावला आहे. नाशिकमधून लोकसभा लढवण्यासाठी मंत्री छगन भुजबळ देखील इच्छुक होते. मात्र त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर माघार घेतली. मात्र त्यानंतर देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाने नाशिक जागेवर दावा सोडलेला नाही. तसेच भाजपची नाशिकमध्ये जास्त ताकद आहे, असे सांगत भाजपने देखील या जागेवर दावा ठोकलेला आहे. यामुळे या जागेचा तिढा हा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

यावरुन छगन भुजबळ यांनी महायुतीला खोचक टोला लगावला आहे. मला वाटलं माझ्यामुळे अडचण होत आहे. त्यामुळे मी निवडणुकीतून दूर झालो. आता अर्ज भरायला देखील सुरुवात झाली आहे. 20 मे हा नाशिक लोकसभेच्या मतदानाचा दिवस आहे. तोपर्यंत तरी येथे उमेदवार जाहीर करावा, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच महायुतीत आम्ही एकत्र काम करणार आहोत. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा आम्ही निवडून आणू, असे देखील त्यांनी म्हटले आहे.