Chandrakant Patil (Photo Credits: Twitter/ ANI)

महाराष्ट्रात लॉकडाऊन करायचा की नाही याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीस विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. "मुख्यमंत्र्यांचा कल लॉकडाऊनच्या दिशेने आहे, मात्र अद्याप काही निर्णय झाला नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

"जवळपास दोन तास मुख्यमंत्र्यांनी व्हर्चुअली राज्यातील सगळ्या विविध पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये प्रत्येकानेच अतिशय सविस्तरपणे करोनाचं वाढतं प्रमाण आणि लॉकडाउन किंवा कडक निर्बंध केल्याने सामान्य माणसाची होणारी होरपळ या दोन्ही बाजू सगळ्यांनीच प्रभावीपणे मांडल्या, पण यातून सर्वात शेवटी अद्याप निर्णय काही झालेला नाही. परंतु मुख्यमंत्र्यांची दिशा या कोरोनावर नियंत्रण करायचं असेल, तर कडक लॉकडाउन करावा अशी दिसतेय" असे चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.हेदेखील वाचा- Maharashtra: महाराष्ट्रात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही; कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. यामध्ये विविध घटकांचा आपण काय विचार करणार आहोत? किती दिवस हे सगळं चालणार आहे. यावरील नेमक्या उपाय योजना काय? अशी काही ठोस योजना तुम्ही मांडल्याशिवाय जर घाईघाईने लॉकडाउन केलं, तर त्याचा फार मोठा उद्रेक होईल.मुख्यमंत्र्यांनी बहुतेक हे मान्य केलं. त्यांचा कल कडक लॉकडाउनच्या दिशेने आहे. पण त्यांनी हे देखील मान्य केलं की अशी काही ठोस योजना बनवावी लागेल." असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.

"मी जो मुद्दा नेहमीच मांडत असतो, तो आजही मांडला. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे मान्य केलं की, असे जे हातावर पोट असणारे समाजातील घटक आहेत, त्यांना काय पॅकेज देता येईल, याचा विचार आम्ही करू. त्यांनी यामधील जी अडचण सांगितली, ती बरोबर नाही. ते म्हणाले की, याच्या नेमक्या संख्या नसतात.. तर सगळ्यांच्या संख्या असतात. सगळे रिक्षावाले, टॅक्सीवाले, फेरीवाले, घरकाम करणारे रजिस्टर असतात, त्यामुळे सरकारला प्रश्न पडण्याचं काही कारण नाही. इच्छा शक्ती असेल तर सर्वसामान्यांचं पोट भरण्याच्या दृष्टीने सोमवारी तुम्ही निर्णय घेऊ शकतात.''

एकूणच आजची बैठकीनंतर उद्या मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत बैठक होईल. त्यानंतर सोमवारपर्यंत लॉकडाऊन आणि अन्य नियमांसंबंधीची भूमिका स्पष्ट होईल असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.