प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : The Orcadian

5 आणि 6 डिसेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर 7 आणि 8 डिसेंबरला मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग आणि लातूर जिल्ह्यांमध्ये ही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डिसेंबर महिना उजाडल्यावर राज्यात थंडीला सुरुवात झाली असली तरी, अद्याप बोचऱ्या थंडीचा अनुभव नागरिकांनी घेतलेला नाही. त्यातच आता तापमानवाढीचे संकेतही हवामान खात्याने दिले आहेत.

वातावरणातील प्रतिकूल बदलांमुळे थंडी ओसरणार असून तापमानात काही प्रमाणात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यंदा देशभरात किमान तापमान बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. थंड प्रदेशातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता 39 टक्के इतकी आहे़. त्यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर, हरियाना, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्याचा त्यात समावेश आहे़. विषुववृत्ताजवळील हिंदी महासागर आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. तर पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाहदेखील सक्रिय असल्याने दक्षिण भारतात पाऊसाची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईच्या किमान तापमानाचा पारा 20 अंशाच्या खाली घसरत नसला तरी, मागील दोन दिवसांपासून मुंबईचे हवामान ढगाळ नोंदविण्यात येत आहे. तर पुण्यामध्ये बोचरी थंडी अनुभवायला मिळत असून, काल दिवसभरात 12.8 किमान आणि 29.7 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.