' मी एखाद्याची नाडी पकडून जप केला तर तो रुग्ण बरा होतो'. असा दावा औरंगाबाद येथील शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज्याच्या एका आरोग्य शिबिरात केल्याने मोठी खळबळ माजली आहे. या दाव्यासोबतच 'जर मला प्रमोद महाजनांना (Pramod Mahajan) त्यांच्या शेवटच्या काळात भेटायला मिळाले असते तर कदाचित आपण त्यांना वाचवू शकलो असतो' असेही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. मात्र अत्यावस्थ असलेल्या प्रमोद महाजनांना भेटण्याची परवानगी केवळ त्यांचा मुलगा राहुल महाजनला असल्याने त्याला मी एक पुडी दिली होती. जी प्रमोद महाजनांच्या उशाखाली ठेवण्यात आली होती. यामुळे ते 12 दिवस मृत्यूशी झगडा करत होते मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी गोळीबार केला होता. यामध्येच उपचारादरम्यान प्रमोद महाजन यांचे निधन झाले. महाजन हॉस्पिटलला असताना गोपीनाथ मुंडे यांनी माझ्याकडे येऊन सिद्धीविनायकाचरणी प्रार्थना करून फुल आणून दे. अशी विनवणी केली होती. त्यानंतर आम्ही प्रार्थना केल्या. आई जगदंबेची कुंकवाची पुडी प्रमोद महाजनांच्या उशाखाली ठेवली. पण त्यांना भेटून नाडीवर हात ठेवून मंत्रोच्चार केला असता ते वाचले असते असा दावा खैरेंनी केला आहे. यापूर्वी ज्या ज्या रुग्णांसाठी प्रार्थाना केली ते बचावले. केवळ प्रमोदजींना भेटून मंत्र म्हणता न आल्याने ते गेले ही हुरहूर वाटते असेही चंद्रकांत खैरे यांनी जाहीर सांगितले आहे. मंत्रोच्चार करून रुग्ण बरा होतो ही अंधश्रद्धा नव्हे तर माझी श्रद्धा आहे असे खैरेंचे मत आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी खैरेंना १०० रुग्ण आणून देतो, त्यांना बरे करून दाखवा असे आव्हान दिले आहे. मात्र माझा मंत्रोच्चार केवळ जवळच्या, खास आणि अत्यावस्थ रुग्णांसाठीच आहे असे सांगत उडवाउडवीची उत्तरं दिली आहेत.