मध्य रेल्वे अनेकदा उशिरा धावत असल्याने चर्चेमध्ये असते. मात्र 30 डिसेंबरच्या दिवशी सकाळच्या वेळेस मध्य रेल्वेवर धावणार्या सीएसएमटी ते ठाणे (CSMT - Thane) लोकलदरम्यान चालकाने प्रसंगावधान दाखवत ट्रेन थांबवून जखमी महिला प्रवाशाला मदत केली आहे. आर एस तिवारी ( RS Tiwari ) असं या मदत करणार्या मोटारमॅनचं नाव आहे.
आर. एस. तिवारी मोटारमॅनचं सर्वत्र होतयं कौतुक
30 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता योशिता महाजन (Yoshita Mahajan) ही महिला माटुंगा -सायन स्थानकादरम्यान रेल्वे रूळावर बेशुद्ध पडली. तिवारी यांनी या महिलेला पाहून तात्काळ आपत्कालीन ब्रेक मारले.त्यानंतर मदतीसाठी गार्डसोबत खाली उतरला. योशिता यांच्या शरीरावर जखमा होत्या. बेशुद्ध अवस्थेत असल्याने योशितांना ट्रेनमध्ये बसवण्यासाठी काही प्रवाशांनी मदत केली. सायन स्टेशनवरून रूग्णवाहिका बोलावून त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
योशितांना अचानक चक्कर आल्याने त्या ट्रेनमधून खाली पडल्या. तिवारी यांच्या प्रसंगावधानाने त्यांचा जीव वाचला. योशिताच्या आईनेही तिवारी यांचे आभार मानले आहेत. देवदूताप्रमाणे धावून आलेल्या या मोटारमॅनमुळे मुलगी वाचल्याची प्रतिक्रिया बोलून दाखवली.