महाविकास आघाडी मधील कॅबिनेट मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाली आहे. 56 वर्षीय एकनाथ शिंदे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून याची माहिती देताना काल (23 सप्टेंबर) त्यांचा कोव्हिड 19 (COVID 19) चा अहवाल पॉझिटिव्ह आला असून प्रकृती ठीक असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मागील काही दिवसांमध्ये संपर्कात आलेल्यांनी योग्य काळजी घ्यावी असं आवाहन करत स्वतःची कोव्हिड चाचणी करून घ्यावी, आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन केले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास विभागाचा कार्यभार आहे. Varsha Gaikwad Tested Positive For Coronavirus: महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना विषाणूची लागण; संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन.
दरम्यान एकनाथ शिंदे हे जुने शिवसैनिक आहेत. मागील काही दिवसांपासून ते कोरोनाची लागण झालेल्या अनेक शिवसैनिकांची, त्यांच्या कुटुंबियांची आपुलकीने चौकशी करताना दिसले आहेत. अनेकदा पीपीई कीट घालून त्यांनी कोव्हिड वॉर्डमध्ये जाऊन रूग्णांची आपुलकीने चौकशी केली आहे. आता एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांचे ट्वीट
काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 24, 2020
महाराष्ट्रातील महाविकस आघाडी सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत,धनंजय मुंडे, अशोक चव्हाण, बच्चू कडू, वर्षा गायकवाड यांच्या पाठोपाठ आता एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मागील सहा महिन्यांपासून ते फिल्डवर अॅक्टीव्ह आहेत. रायगड इमारत दुर्घटना, भिवंडी इमारत दुर्घटनेमध्येही त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.
एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितल्यानंतर अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.