बुलढाणा: घरात सापडला दिव्यांग महिलेचा विवस्त्र मृतदेह; बलात्कार करून हत्या केल्याचा संशय
Representational Image | (Photo Credits: PTI)

हैदराबाद (Hyderabad) येथील निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती, उन्नाव (Unnao) येथील बलात्कार पीडितेचा मृत्यू या एकूणच घटनांनी देश ढवळून निघाला आहे. अशातच बुलढाणा (Buldhana) मधून आणखीन एक धक्कादायक वृत्त समोर येत आहे. बुलढाणा शहरातील एका 55 वर्षीय दिव्यांग महिलेचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळल्याने आजूबाजूच्या परिसरात एकाच खळबळ पाहायला मिळत आहे. या महिलेचा मृतदेह विवस्त्र असल्याने हत्यार्यांनी तिच्यावर आधी बलात्कार (Rape Case) करून मग धारदार शस्त्राने हत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार, जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा या गावात ही घटना घडली आहे. खेडा येथील 55 वर्षीय दिव्यांग महिला शुक्रवारी (6 डिसेंबर) रात्री आपल्या घरात झोपली होती. रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी घरात शिरून तिच्या पोटावर वार केला. या मध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे समजतेय.  (उन्नाव: बलात्कार झाला की बघूयात! पीडित महिलेच्या तक्रारीवर पोलिसांचे निर्दयी उत्तर)

दरम्यान, शनिवारी (7 डिसेंबर) सकाळी आठ वाजताच्या सुमारास या महिलेचा काहीच आवाज नसल्याने शेजारपाजाऱ्यांना संशय येऊ लागला. काहींनी प्रयत्न करून घरात वाकून पाहिल्यावर त्यांना सदर महिलेचे प्रेत विवस्त्र अवस्थेत आढळून आले. यानंतर तातडीने पोलिसांना बोलावून या प्रकरणाची माहिती देण्यात आली. घटनेननंतर महिलेच्या अंगावर कपडे नसल्याने बलात्कार करून तिची हत्या झाली असावी, असा दाट संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून अद्याप कोणीही आरोपी आढळून आलेला नाही.