बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघ: खामगाव ते मेहकर मधील उमेदवार, महत्वाच्या लढती आणि निकाल जाणून घ्या

विदर्भातील बुलढाणा आणि मोताळा तालुका यांचा मिळून बनलेला बुलढाणा विधानसभा मतदारसंघा राजकीयदृष्ट्या फार महत्वाचा आहे. या ठिकाणी घाटावरचे आणि घाटाखालील मतदारांमधील सुप्त संघर्ष येथे पहायला मिळतो. त्याचसोबत उमेदवारी देताना जातीपातीचे राजकरण येथे केले जात. एवढेच नाही तर तिकिट दिलेला उमेदवार कोणत्या भागातील आहे हे सुद्धा पाहिले जाते. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मेहकर, जळगाव (जमोद), खामगाव, बुढाणा, सिंदखेडराजा, चिखली आणि मलकापूर मतदारसंघ येतात. महाराष्ट्रात एकूण 288 मतदारसंघ आहेत.

-मेहकर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 25

गेल्या २५ वर्षांपासून मेहकर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे या मतदारसंघात शिवसेनेचाच झेंडा रोवल्याचे दिसून येते. आता मात्र पक्षांतर्गत वाढलेल्या गटबाजीच्या राजकारणाची इच्छुकांनी धास्ती घेतली. यंदाचे येथे शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय रायमुलकर आहेत. 2014 मध्ये काँग्रेसच्या लक्ष्मणराव घुमरे यांचा 44,421 मतांनी रायमुलकर यांच्या विरोधात पराभव झाला होता. यावेळी निवडणूकीसाठी शिवसेनेकडून संजय गायकवाड यांच्या विरोधात हर्षवर्धन सकपाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

-जळगाव (जामोद) विधानसभा मतदारसंघ क्रमांक 27

जळगाव जामोद शहर हे सातपुड्याच्या कुशीत असल्याने त्याला सातपुडा नगरी म्हणून संबोधले जाते. सातपुड्यात भिंगारा हे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. या मतदारसंघात सध्या भाजपचे विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे आहेत. 2014 मध्ये बीबीएम पक्षाच्या बाळासाहेब तायडे यांचा 59,193 मतांनी पराभव झाला होता. यावेळी पुन्हा कुटे यांना रिंगणात उतरवण्यात आले असून त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून स्वाती वाकेकर यांना उमेदावरी दिली आहे.

-खामगाव विधानसभा मतदारसंघ क्रमांक 26

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या भावनिक वक्तव्यांना मतदारांनी प्रतिसाद देत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला खामगाव विधानसभा मतदारसंघ भाजपाचे आकाश फुंडकर यांच्या स्वाधीन केला. मात्र या निवडणुकीत भारीपची मोठी भूमिका निर्णायक राहिली. या मतदारसंघात भाजपचे आमदार आकाश फुंडकर आहेत. 2014 मध्ये फुंडकर यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या काँग्रेसच्या दिलीपकुमार सानंदा यांचा 64,758 मतांनी पराभव झाला होता. यावेळी सुद्धा आकाश फुंडकर यांना भाजपकडून उमेदवारी दिली आहे.

-सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 24

स्वराज्यजननी राजमाता जिजाऊंची जन्मभूमी अशी ओळख असलेल्या सिंदखेड राजामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी चुरस रंगणार आहे. राज्यात आघाडीत आणि युतीमध्ये जो सुप्त संघर्ष सुरु आहे त्याची झलक सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर आहेत. 2014 मध्ये भाजपचे गणेश मंते यांचा 45,349 मतांनी पराभव झाला होता. यावेळी पुन्हा खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून राजेंद्र शिंगणे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

-चिखली विधानसभा मतदारसंघ क्रमांक 23

चिखली विधानसभा मतदारसंघाची ओळख म्हणजे नागपूरनंतर विदर्भात प्रभावी केंद्र म्हणून चिखली ओळखले जाते. हे जरी खरं असल तरी भाजपाच्या या मतदारसंघात तीन वेळा विजय वगळता काँग्रेसचे वर्चस्व या मतदारसंघात बघायला मिळते. सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे आहेत. 2014 मध्ये भाजपच्या सुरेशप्पा कबुतरे यांना 47,520 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. यंदाच्या निवडणूकीसाठी भाजपकडून श्वेता महाले यांच्या विरोधात पुन्हा राहुल बोंद्रे यांना तिकिट दिले आहे.

-बुलढाणा विधानसभा मतदारसंघ क्रमांक 22

बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा हा क्रमांक २२ वा विधानसभा मतदारसंघ आहे. येथे सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार हर्षवर्धन सकपाळ आहेत. 2014 मध्ये मनसेच्या संजय गायकवाड यांचा 35,324 मतांनी पराभव झाला होता. यावेळी विधानसभेचे तिकिट शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्या विरोधात पुन्हा काँग्रेसने सकपाळ यांना उमेदवारी दिली आहे.

-मलकापूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक 21

मलकापूर मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात आजवरच्या इतिहासात केवळ दोनच वेळा काँग्रेसला विजय मिळवता आला आहे. ते वगळता मलकापूर कायमच भाजपच्या ताब्यात राहिला आहे. या मतदार संघात सध्या भाजपचे चैनसुख मदनलाल संचेती हे विद्यमान आमदार आहेत. 2014 मध्ये संचेती यांच्या विरोधातील काँग्रेसचे अरविंद कोलते यांचा 49,019 मतांनी पराभव झाला होता. यावेळच्या विधानसभा निवडणूकीसाठी पुन्हा संचेती यांना तिकिट दिले आहे. तर संचेती यांच्या विरोधात काँग्रेसचे राजेश एकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 येत्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. तसेच या निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवत एक हाती सत्ता मिळवली होती. परंतु, या विधानसभेत कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.