मुंबई उच्च न्यायालय (Photo credit : Youtube)

मुंबई :  बेस्ट (BEST) च्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे. गेले सात दिवस बेस्ट सेवेविना मुंबईकरांचे हाल होत आहेत. मात्र अजूनही या प्रश्नावर काही तोडगा न निघाल्याने आज या गोष्टीची मुंबई हायकोर्टा (Bombay High Court)त सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी या संपाबाबत हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना चांगलच झापले आहे. त्रिस्तरीय समिती स्थापन झाल्यानंतर संप मागे घ्यायला हवा होता. तसेच संपावर राहून तडजोडीची चर्चा करणे योग्य नाही असे कोर्टाचे म्हणणे आहे. कोर्टाने आता आज दुपारी तीन वाजता महाधिवक्त्यांना पाचारण केले आहे. त्यामुळे तीननंतर कोर्टाची पुढील सुनावणी सुरु होणार आहे. दरम्यान आम्ही चर्चेला नेहमीच तयार आहोत असे बेस्ट कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता प्रशासन आणि कर्मचारी यांमध्ये मध्यस्ती करून कोर्ट काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा : बेस्ट संपावर बोलणी निष्फळ; मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक चर्चा, तोडगा नाही: शशांक राव)

या संपामुळे सध्या शहरासह मीरारोड, भाईंदर, ठाणे, नवी मुंबईपर्यंतची बससेवा ठप्प झाली आहे. बेस्टच्या रोजच्या 25 ते 30 लाख प्रवाशांना या संपामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. त्यानंतर बेस्ट प्रशासनाने मेस्मासह कर्मचारी वसाहतीतील घरे रिकामी करण्याची नोटीस दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. संपावर तोडगा काढला नाही तर सोमवारी मुंबईत तमाशा करु असा इशारा बेस्ट प्रशासनाला दिल्यानंतर मनसे रस्त्यावर उतरली आहे. मनसेने कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे. संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचे सुरु करु देणार नाही असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.