File image of BMC headquarters | (Photo Credits: Facebook)

मुंबई (Mumbai) मधील कोरोना व्हायरसची वाढती संख्या पाहता मुंबई महानगरपालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. दिल्ली (Delhi) मधील निजामुद्दीन येथे तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाला गेलेल्यांनी ताबडतोब मुंबई महानगरपालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले आहे. यासाठी पालिकेने 1916 हा नंबर जारी केला असून या नंबरवर संपर्क साधून आपल्या प्रवासाची माहिती देण्यास सांगितले आहे. तसंच असे न करणाऱ्यांवर आयपीसी (IPC), डीएम अॅक्ट (DM Act) आणि एपिडेमीक अॅक्ट (Epidemic Act) या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार सर्वोतोपरी खबरदारी घेत असताना अचानक समोर आलेल्या तबलिगी मकरज प्रकरणामुळे चिंता अधिक वाढली. तसंच इतर राज्यांसह महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. तर मुंबई मधील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान पुढील धोका टाळण्यासाठी बीएमसीने हे पाऊल उचललेले आहे. सध्या राज्यात कोरोनाचे बाधितांचा आकडा 781 वर पोहचला आहे. त्यापैकी एकट्या मुंबईत कोरोनाचे 469 रुग्ण आहेत. (महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे राज्यावरील मोठे संकट टळले; तबलिगी जमातला वसई येथे करायचा होता कार्यक्रम)

BMC Tweet:

कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्यास मज्जाव असल्याने अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. मात्र दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी समाजाकडून एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गेल्या महिन्यात झालेल्या या कार्यक्रमाला तब्बल 2300 लोकांनी उपस्थिती लावली होती. यात 16 देशातील नागरिक सहभागी झाले होते. तर महाराष्ट्रातील मुंबई, रत्नागिरी, औरंगाबाद, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड या भागातील नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र हे भाविक आपल्या घरी परतल्यानंतर त्यांच्यामुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.