BMC (Photo Credits: Twitter)

मुंबई महानगरपालिका ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या अनेक तरूणांना बीएमसीमध्ये नोकरी करण्याचा ध्यास असतो. मात्र आता मुंबई महानगर पालिकेमध्ये नोकर भरती बंद होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.न्यूज १८ लोकमत वृत्तानुसार, मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्यामुळे आता त्याचा परिणाम थेट नोकर भरतीवर होणार आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पालिका प्रशासन काही मार्गांचा त्यापैकी एक म्हणजे कायमस्वरूपी नोकरभरती करण्याऐवजी आता पालिका कंत्राटी स्वरूपात कर्मचार्‍यांची निवड करण्याच्या विचारात आहे.

मुंबई महापालिकेत स्थगित करण्यात आलेली ही नोकर भरती तात्पुरती आहे की कायमस्वरुपी याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही. मागील 4 महिन्यात पालिकेच्या उत्पन्नात घट आणि खर्चात झालेली वाढ झाली आहे. यामुळे मुंबई महानगरपालिका तोट्यात आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांनी एक परिपत्रक काढून खर्चावर तात्काळ नियंत्रण आणण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम नोकरभरतीवरदेखील होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या 90 हजाराहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. पालिका प्रशासन कंत्राटी कर्मचार्‍यांचा विचार करत असल्यास त्याला कामगार संघटनांनी विरोध केला आहे. नोकरभरती रद्द करण्यापेक्षा इतर पर्यायंनी आर्थिक स्थिती पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे.