कोरोनाने महाराष्ट्रात पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून मुंबईतही (Mumbai) कोरोना रुग्णांची संख्या (Coronavirus Cases) झपाट्याने वाढत आहे. यात लोकल रेल्वे काही नियमांसह सुरु करण्यात आल्याने सामान्य नागरिकांची लोकलमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. हेदेखील कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचे कारण ठरू शकते. त्यामुळे लोकलची ही गर्दी कमी करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचा (BMC) निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेने खासगी कार्यालयांमध्ये केवळ 50% कर्मचा-यांच्या उपस्थितीचे आदेश दिले आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक विभागात मनपाने पाच पथके तैनात केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मनपाची 5 पथके खासगी कार्यालयांवर नजर ठेवणार आहे. नियम मोडणा-या कार्यालयांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. खासगी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती असली तरी पालिका कर्मचाऱ्यांची उपस्थिती मात्र 100 टक्केच राहणार आहे.हेदेखील वाचा- Solapur Weekend Lockdown: सोलापुरात वीकेंड लॉकडाऊन, जाणून घ्या काय असतील महत्त्वाचे नियम
मुंबई शहरात काल (25 मार्च) दिवसभरात 5504 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. दिवसभरात 2281 कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. तर 14 जणांचा मृत्यू झाला. शहरात काल दिवसभरात 46869 इतक्या चाचण्या झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 35,952 रुग्णांची व 111 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज राज्यात 20,444 रुग्ण बरे झाले आहेत.यासह एकूण प्रकरणांची संख्या 26,00,833 वर गेली आहे. राज्यात आतापर्यंत 22,83,037 रुग्ण बरे झाले आहेत व 53,795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 2,62,685 सक्रीय रुग्णावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान नागपूर शहरात दिवसभरात 3,579 जणांना कोरोना संक्रमण, तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेऊन काल दिवसभरात 2,285 जण बरेही झालेआहेत. तर पुणे शहरात गेल्या 24 तासात 6,432 जणांना कोरोना संक्रमण झाले आहे. 2,808 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 42 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेने दिली आहे.