Mumbai Water Cut: मुंबई सह ठाणे, भिंवडी भागामध्ये 5 ऑगस्ट पासून 20% पाणीकपात
Water supply | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मध्ये यंदा सरासरी पाऊस पडला असला तरीही यंदा तो पाऊस तलावक्षेत्रामध्ये अपेक्षेप्रमाणे न पडल्याने आता मुंबई महानगर पालिका 5 ऑगस्ट पासून 20% पाणी कपात करण्याच्या तयारीमध्ये आहे. आज बीएमसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या तलावक्षेत्रामध्ये केवळ 34 % पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान मागील वर्षी याच सुमारास मुंबईच्या तलाव क्षेत्रात 85.68% पाणीसाठा होता. तर 2018 साली हा पाणीसाठा 83.30% इतका होता.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावांमध्ये यंदा जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पावसाळ्याच्या पुढील काही दिवसांमध्ये तलावामध्ये पुरेसा पाऊस बरसला नाही तर मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या तलावामध्ये पाणीसाठ्याची टंचाई असेल. मुंबई सोबतच ठाणे आणि भिंवडी परिसरामध्येही पाणी टंचाई असेल. त्यामुळे तेथे देखील पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे.

सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या 7 तलावांपैकी केवळ सर्वात लहान असणार्‍या तुलसी तलाव काही दिवसांपूर्वी ओव्हरफ्लो झाला आहे. दरम्यान मुंबई हवामान वेधशाळेने येत्या काही दिवसांत मुंबई सह पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत बरसणारा पाऊस हा तलावक्षेत्रामध्येही बरसावा अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई प्रमाणेच पुणे जिल्ह्याला देखील पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे.