Suraj Chavan | Twitter

शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांची ईडी नंतर आज मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) चौकशी सुरू झाली आहे. कोविड घोटाळा प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून कोविड घोटाळा प्रकरणामध्ये एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे आदेस देण्यात आले होते त्यानुसार आता मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या देखरेखीखाली ही एसआयटी काम करत आहे.

कॅगच्या अहवालानुसार, महापालिकेमध्ये 12,000 कोटी रूपयांच्या खर्चात कथित अनियमितता आहे. बीएमसीच्या 9 विभागांनी केलेल्या एकूण 12 हजार कोटीच्या खर्चामध्ये अनियमितता आहे.

मुंबई मध्ये कोविड संकटाच्या वेळेस उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड केअर सेंटर मधील घोटाळ्यात आता सूरज चव्हाण यांना सामोरं जावं लागत आहे. या प्रकरणी मनी लॉड्रिंग चा तपास करणाऱ्या ED ने सुजित पाटकर आणि दहिसर जंबो कोव्हिड सेंटरचे डीन किशोर बिसुरे यांना काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या आहेत.

बीएमसी च्या या कोविड केअर सेंटर मधील कथित घोटाळ्यामध्ये ईडी ने अनेक बीएमसी अधिकार्‍यांच्याही घरी छापेमारी केली आहे. यामध्ये कागदपत्रं गोळा केली आहेत, व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स मिळवली आहेत. या प्रकरणात मुंबई महानगर पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं देखील नाव समोर येत आलं होतं. मात्र किशोरी पेडणेकर यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.