
मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) बेस्ट बस तिकीट वाढीचा ( BEST Bus Fare Hike) प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता बेस्ट च्या 31 लाख प्रवाशांना दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, बीएमसीने बेस्टच्या किमान 5 ते कमाल 15 रूपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे जेव्हा ही दरवाढ लागू केली जाणार तेव्हा नॉन एसी बसचं किमान भाडं 5 वरून 10 रूपये तर एसी बसचं भाडं 6 वरून 12 रूपये होणार आहे.
बेस्ट कडून 2019 मध्ये प्रवासी संख्या वाढवण्यासाठी बसचं भाडं कमी करण्यात आलं होतं. बेस्ट कडून नॉन एसी बस मध्ये किमान 5 आणि कमाल 20 रूपये आकारले जात आहेत. तर एसी बस मध्ये किमान 6 कमाल 25 रूपये आकारले जात आहेत. पण आता बेस्ट आर्थिक संकटांमधून बाहेर पडण्यासाठी पुन्हा भाडेवाढ करत आहे. नव्या प्रस्तावित दरवाढीनंतर नॉन एसी बसचं किमान भाडं 10 रूपये आणि कमाल भाडं 35 रूपये होणार आहे तर एसी बससाठी किमान 12 रूपये आणि कमाल 40 रूपये भाडं होणार आहे.
BEST General Manager S V R Srinivas यांनी फेब्रुवारी महिन्यात ही प्रस्तावित भाडेवाढ दिली आहे. बेस्ट सध्या दरवर्षी 845 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते आणि तिकिटांच्या या वाढीमुळे ते सुमारे 1400 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. अधिकृत सूत्रांचा दावा आहे की भाडेवाढीमुळे 590 कोटी रुपयांचा महसूल वाढण्याची अपेक्षा आहे. (हेही वाचा: NMMT Announces Revised Timetable: नवी मुंबई मधून मंत्रालय कडे जाणार्या 4 AC Bus च्या वेळापत्रकात बदल; घ्या जाणून सुधारित वेळा).
"बीएमसीचा ठराव ही एक वैधानिक आवश्यकता आहे. आम्ही ते केले आहे. आता ते बेस्टवर अवलंबून आहे." अशी प्रतिक्रिया मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे.
दरम्यान मुंबई प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या (Mumbai Regional Transport Authority) च्या मंजुरीनंतर नवीन भाडेवाढीची अंमलबजावणी लागू केली जाणार आहे.
मुंबई मध्ये मागील काही महिन्यांत बेस्ट बसचे अपघात सत्र, इलेक्ट्रिक बस मध्ये आग लागणं या घटनांमुळे सामान्यांच्या मनात संताप आहे. अशात आता दुप्पट्टीने होऊ पाहणार्या दरवाढीवरून पुन्हा नाराजी व्यक्त होऊ शकते.